रेल्वेचा रूळ ओलांडण्याच्या नादात गमावला जीव
रेल्वेचा अपघात ही अतिशय दुर्दैवी घटना असते परंतु अनेकदा तर लोक आपल्या स्वतः च्या चुकीमुळेच आपला जीव गमावतात. अशीच एक घटना नुकतीच उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर जिल्ह्यात घडली आहे. मालगाडी जात असल्याने रेल्वे फाटक बंद असतानाही रुळ ओलांडण्याच्या नादात एका विद्यार्थिनीने जीव गमावला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मालिपूर रेल्वे स्थानकात एका मुलीने रुळ ओलांडताना जीव गमावला आहे. सीसीटीव्हीत अंगावर काटा आणणारी ही घटना कैद झाली आहे. व्हिडीओत दिसत आहे की, फक्त काही सेकंदाच्या अंतराने मुलगी एक्स्प्रेसच्या खाली येते आणि आपला जीव गमावते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, मालगाडी जाणार असल्याने रेल्वे फाटक बंद होतं. यावेळी बाईक, कार फाटकाच्या आधी थांबलेल्या होत्या. याचदरम्यान एक विद्यार्थिनी फाटकाखालून वाकत घाईत रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करते. पण ती रुळ ओलांडत असताना काही सेकंदाचा उशीर होतो आणि आपला जीव गमावते. ती काही हालचाल करण्याआधीच मालगाडी तिला उडवते. धडक इतकी जबरदस्त असते की तिचा जागीच मृत्यू होतो.
रेल्वे प्रशासन वारंवार रेल्वे रुळ ओलांडणं धोकादायक आहे असा इशारा देत असतं. ही घटना रेल्वे सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास काय होऊ शकते याची आठवण करुन देत आहे. स्थानिक पोलिस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
अशाच एका घटनेत, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गुरुवारी रेल्वे रुळ ओलांडताना गुजरातकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने धडक देऊन 16वर्षीय वैष्णवी रावल हिचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी इअरफोन लावल्यामुळे विद्यार्थिनीला जवळून येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही.