सिद्धू मुसेवालांची ३० गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा चकमकीत खात्मा
अमृतसर : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालांची (sidhu moosewala) भरदिवसा ३० गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा अमृतसरजवळ झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील दोन संशयित शार्पशूटर आणि पंजाब पोलिसांच्या तुकडीमध्ये बुधवारी (२० जुलै) दुपारी दोनच्या सुमारास अटारी सीमेजवळ चकमक झाली.
या चकमकीत पंजाब पोलिसांनी दोन्ही संशयितांचा खात्मा केला. अमृतसरजवळच्या गावात चकमक सुरू झाल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही चकमक जवळपास ३ तास चालली. अटारी सीमेजवळच्या भाकना कालन गावामध्ये ही चकमक झाली. हल्लेखोर गावातील एका बंगल्यामध्ये लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी या बंगल्याला सर्व बाजूंनी घेरलं. ज्या ठिकाणी ही चकमक झाली, तो भाग भारत पाकिस्तान सीमेपासून जवळ असल्याने हे हल्लेखोर पाकिस्तानमध्ये पळून जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींकडून एके-४७, पिस्तुल व इतर साहित्य जप्त केलं आहे.
या चकमकीत ३ पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय एका कॅमेरामनलाही गोळी लागली. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जगरुप रोपा आणि मनप्रित कुसा असं या दोन संशयित हल्लेखोरांची नावं आहेत. यापैकी एका हल्लेखोराने सर्वात आधी एके-४७ मधून मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला होता.
सिद्धू मुसेवालांवर ३० गोळ्या झाडल्या…
पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी सायंकाळी जवाहरके गावात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला करण्यात आला होता. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असतानाच सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता.
सिद्धू मुसेवाला यांना चार शसस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आलेली होती. या सुरक्षेमध्ये २८ मे रोजी कपात करुन पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने केवळ दोन सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले होते. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्चूनरही होती. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने दोन मित्रांसोबत प्रवास करत होते.
सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवालांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र अचानक सिद्धू मुसेवालांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केलं होतं. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला होता.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-९४ रायफलच्या गोळ्या सापडल्याची माहिती दिली होती.