भरधाव डंपरने गाड्यांना अक्षरशः चिरडले
एका भरधाव डंपरने टोलनाक्यावर रांगेत असलेल्या काही गाड्यांना अक्षरशः चिरडले. डेहरादून-हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
डेहरादून-हरिद्वार महामार्गावरील लच्छीवाला टोलनाक्यावर हा भयंकर अपघात घडला. अनियंत्रित झालेल्या डंपरने अनेक कारला जोराची धडक दिली. यात सगळ्यात शेवटी असलेल्या कारचा चेंदामेंदा झाला. टोलनाक्यावरील खांब आणि डंपरच्या मध्ये कारचा सांगाडा अडकला होता.
अपघाताचे कारण आले समोर
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर डेहरादूनवरून डोईवालाकडे जात होता. लच्छीवाला टोलनाक्याजवळ आल्यानंतर चालकाने ब्रेक लावला, मात्र ब्रेक फेल झाल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि समोर उभ्या असलेल्या गाड्या चिरडल्या गेल्या.
यात दोन कारचा चुराडा झाला, तर एका गाडीतील दोघे जागीच ठार झाले आहेत. कारचा चेंदामेंदा झाल्याने दोन मृतदेह दबले गेले होते. पोलिसांनी बऱ्याच वेळानंतर ते बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
मृतांची ओळख पटली
मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख पटली असून, त्यांचे नाव रतनमणी उनियाल असे आहे. ते डेहरादूनमधील रायपूर येथील इंद्रप्रस्थ इनक्लेव्ह येथील रहिवासी आहेत. दुसऱ्या मयत व्यक्तीकडे किशोरी लाल पवार नाव असलेले ओळखपत्र सापडले आहे. त्याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.