सिडकोची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होणार शिवसेना उपशहर प्रमुखांच्या प्रयत्नांना यश

संभाजीनगर/ प्रतिनिधी - शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपशहरप्रमुख दत्तात्रय वर्पे गेल्या काही महिन्यापासून सिडकोची प्रलंबित कामे पूर्ण करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सिडको प्रशासनाने त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
सिडकोच्या प्रलंबित कामानिमित्त शिवसेनेचे उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी दि. 24 मार्च रोजी सिडकोच्या मुख्य प्रशासक भाग्यश्री विसपुते व प्रशासक भागवत बिघोत यांची भेट घेऊन सिडको महानगरचा पाणीप्रश्न तसेच प्रलंबित विकास कामांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी नागरिकांच्या सर्व मागण्यांवर प्रशासनाने सखोल विचार केलेला असून प्रलंबित सर्व कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जलदगतीने हालचाली सुरू केलेल्या असल्याचे मुख्य प्रशासक भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले. यावेळी एमआयडीसी कडून अतिरिक्त पाणीपुरवठा मागितला असून पाईप लाइन मध्ये ठिकठिकाणी असलेले सर्व लिकेज तात्काळ काढण्याचे आदेश इंजिनिअरिंग विभागाला दिल्याचे प्रशासक भागवत बिघोत यांनी सांगितले. लवकरच पाणीप्रश्नासह सर्व प्रमुख मागण्या पुर्ण करू असे आश्वासन यावेळी उभयतांनी नागरिकांना दिले. या आश्वासनानंतर दिनांक १० मार्चपासून सुरू असलेले शिवसेनेचे (उबाठा) बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे, दत्तु कोठाळे, ज्ञानेश्वर फुलारे, भगवान चंदन आदींची उपस्थिती होती. महिला आघाडीच्या अनिता पाटील डहारिया यांचीही या निवेदनावर स्वाक्षरी आहे