माणसाच्या जगण्याला सिनेमामुळे समृद्धी - चित्रपट समीक्षक अशोक राणे
औरंगाबाद / प्रतिनिधी - सिनेमा असो की कोणतीही कला जगात कुठलीही गोष्ट वाईट नाही. ती गोष्ट तुम्ही वापरता कशी त्यावर ते अवलंबून असते. आपल्याला डोळ्यांनी प्रत्येक गोष्ट दिसते पण पाहण्याची एक प्रक्रिया असते. आपण चांगलं साहित्य वाचावे, दर्जेदार चांगले संगीत ऐकावे आणि चांगले सिनेमे पाहावेत. कारण सिनेमामुळे माणसाचे जगणे समृद्ध होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी केले.
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ताने डॉ बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागाद्वारे आयोजित चित्रपट रसग्रहण कार्यशाळेत बोलत होते. याप्रसंगी मंचावर दिग्दर्शक शिव कदम, अभिनेते किशोर कदम, सुहास तेंडुलकर, प्रवीण डाळिंबकर, डॉ. आनंद निकाळजे, विभागप्रमुख दासू वैद्य व समन्वयक डॉ कैलास अंभुरे उपस्थित होते.
पुढे अशोक राणे म्हणाले, एखादा चित्रपट महोत्सव म्हणजे खूप दर्जेदार सिनेमा असतात अशी आपली समजूत असते. आपली रडगाणी गाणारी माणसेही त्यात असतात. चित्रपटात जे दाखवले जाते ते जीवनात घडत नाही. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, परंतु व्यावसायिक दृष्टिकोनामुळे चित्रपटात मनोरंजन करताना भान सुटलेले दिसते. सिनेमा अंधाऱ्या पोकळीत बघायची गोष्ट आहे ती मोबाईलवर किंवा ओटीपी प्लॅटफॉर्मवर नाही. असेही ते म्हणाले.
दिग्दर्शक शिव कदम म्हणाले की, सिनेमा हा कमोडिटी मार्केटचे एक साधन आहे. जो सर्वत्र दाखवला जातो आणि पाहिला जातो केवळ तोच सिनेमा नाही. जो सिनेमा रंजनाच्या दृष्टीने पाहिला जातो त्यामुळे प्रेक्षकांची टेस्ट टेस्ट बिघडली आहे. साहित्य जसे चांगले काम करते तेच सिनेमाही करतो, पण तो सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचत नाही यासाठी चित्रपट महोत्सव असतात. तर अभिनेते किशोर कदम म्हणाले, सिनेमा जगणं आहे. दुःख आहे. स्वप्न आहे आणि आनंद आहे. ती एक पॅशन आहे. ज्याप्रमाणे कथा, कादंबरी, कविता जीवन समृद्ध करतात तसेच सिनेमाचे हे आहे. सिनेमाने प्रेक्षकांच्या जाणिवा विकसित होतात. असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी 'तुझ्या मिठीत ऊब शोधणं नव्हं बरं' ही कविता सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा दासू वैद्य यांनी केले. तर डॉ. कैलास अंभुरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. रामेश्वर वाकणकर, डॉ. विलास गायकवाड, डॉ. दैवत सावंत, गणेश घुले, रामप्रसाद वाव्हळ, कुलदीप चव्हाण, पल्लवी जमधडे, शालिनी साळवे आदींनी सहकार्य केले.