जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात १० स्कॉर्पिओ दाखल

जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात १० स्कॉर्पिओ दाखल

संभाजीनगर/प्रतिनिधी - ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सामाजिक न्याय, तथा पालकमंत्री संजय सिरसाठ यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमांतून 1 कोटी 41 लक्ष रूपयांचा निधी जिल्हा पोलीस दलास उपलब्ध झाला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलाच्या वाहन ताफ्यात नव्याने 10 महिंद्रा स्कॉर्पिओ वाहने दाखल झाली आहेत.

या सर्व वाहन ताफ्यास आज दि. 23 मार्च रोजी सायं 5.00 वाजता पोलीस मुख्यालय येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री संजय सिरसाठ यांच्या शुभ हस्ते या सर्व वाहनांना हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी जालन्याचे खासदार कल्याण काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलीस आयुक्त प्रविण पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सी.ई.ओ. हो.पी. अंकित पन्नु, पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, मा. अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, डि.पी.ओ. भरत वायाळ, हर्षदा सिरसाठ, राजेंद्र जंजाळ, नंदकुमार घोडेले माजी महापौर यांची उपस्थिती होती.



यावेळी पालकमंत्री संजय सिरसाठ, यांनी संबोधित करताना जिल्हयाचा सर्वांगिन विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमांतून कटिबध्द असून नागरिकांच्या संरक्षणासाठी सज्ज असलेले पोलीस दलाचे आधुनिकरण करण्यावर भर देणार आहे. नागरिकांची अपेक्षा असते कि, संकट समयी मदती करिता पोलीसांची गाडी लवकर आली पाहिजे ज्यामुळे त्यांना वेळेत मदत पोहचेल यासाठी पोलीसांची वाहने सुध्दा चांगली असणे आवश्यक आहे. त्यासाठी यापुढे जिल्हा पोलीस दलास मागणीप्रमाणे वाहने व इतर संसाधने ही उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच त्यांना अत्यावश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा या आधुनिक पध्दतीच्या असेल यावर अधिक भर राहिल, ज्यामुळे जिल्हा पोलीस दलास अभिमान वाटेल. या साधनामुळे गुन्हेगारमध्ये जरब बसून शांतीप्रिय नागरिकांना सुरक्षित वाटेल तसेच पोलीसांची सुध्दा यामुळे कार्यक्षता व गतिमानता वाढेल. यापुढेही पोलीसांच्या आधुनिकरणाबाबतच्या पोलीसांच्या मागण्या तत्परतेने पूर्ण करण्यासाठी अग्रेसर राहू असे भरीव आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याचप्रमाणे पुढील एक महिण्यात परत १७ चारचाकी वाहने जिल्हा पोलीसांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसचे एक रुग्णवाहिका सुध्दा देण्यात येणार असून याद्वारे दंगल, बंदोबस्त अथवा तातडीच्या आरोग्याविषयी उपचाराकरिता पोलीसांना रुग्णालयात दाखल करण्यात याद्वारे मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावना करतांना सांगितले कि, लोकसंख्येच्या अनुषंगाने पोलीस वाहतूक व्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदैव तत्पर आहे. नागरिकांना संकटसमयी तातडीच्या मदती करिता चांगल्या वाहनाची पोलीसांना नेहमी गरज असते, मपालकमंत्री महोदय यांनी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमांतून चांगली अद्यावत वाहने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले तसेच या वाहनांद्वारे नागरिकांची सेवा अधिक प्रभावी पणे करू असे आश्वासित केले.तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमप्रसंगी महादेव गोमारे, प्र. उपअधीक्षक (मु.) संतोष वायचळ, पोलीस निरीक्षक, मोटर परिवहन विभाग, पोलीस निरीक्षक अण्णसाहेब वाघमोडे, सतिष वाघ, स.पो.नि. अधिकारी सचिन पंडित, यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा