नऊ महिन्याच्या गर्भवतीने केला बिबट्याचा सामना

संभाजीनगर / प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये एका नऊ महिन्याच्या गर्भवतीने बिबट्याच्या तावडीतून आपल्या पुतणीला वाचवण्याची घटना समोर आली आहे.
हे कोणत्या चित्रपटातील दृश्य नसून सत्य घटना आहे. या गरोदर मातेनं ४ वर्षांच्या पुतणीला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात तलवडे गावात ही घटना घडली. पल्लवी आयनर असं या धाडसी महिलेचं नाव आहे. बालरोग तज्ज्ञ, लेखक आणि वक्ते डॉ. अमोल अन्नदाते यांनी या घटनेबद्दल ट्वीट केलं आहे.
नेहमीसारखाच तो दिवस होता. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या पल्लवीताई अंगणात काम करत होत्या. त्यांच्यासमोर त्यांची श्रुती ही चार वर्षाची पुतणी खेळत होती. अधूनमधून पल्लवीताईसुद्धा श्रुतीसोबत खेळत, बोलत होत्या. इतक्यात अचानक दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्याने श्रुतीला मानेत पकडलं. अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्याने आणि वेदनेने श्रुती कळवळली. तिने मोठ्याने रडायला सुरूवात केली. पल्लवी यांनाही एक क्षण काय झाले कळलेच नाही. बिबट्या कुठून आला, त्यानं चिमुकलीला कसं पकडलं. त्या भांबावून गेल्या पण क्षणार्धात सावरल्या. खरंतर तो प्रसंग पाहून कुणीही आपला आणि गर्भातील बाळाचा जीव वाचवण्यासाठी घराच्या आत धूम ठोकली असती. परंतु, पल्लवी यांनी नेमके त्याच्या उलट केलं. श्रुतीला बिबट्याच्या जबड्यात पाहून त्या गर्भवती बाईमधील होऊ घातलेली आई जागी झाली. स्वत:ला सुरक्षित करण्यापेक्षा पुतणीचा जीव वाचवणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले.
मोठ्याने ओरडत बिबट्याच्या अंगावर पल्लवीताई धावून गेल्या. त्या गर्भवती मातेचा आवेश आणि डरकाळी ऐकून बिबट्याचाही थरकाप उडाला असावा. बेसावध बिबट्याने चिमुकलीला तिथेच टाकलं. कल्पने पलिकडील प्रतिकार पाहून भेदरलेल्या बिबट्याने तिथून धूम ठोकली. पल्लवी यांच्या प्रसंगावधानामुळे बिबट्याच्या तावडीतून श्रुती सुखरूप बाहेर पडली. पल्लवीच्या या धाडसाचं गावात कौतुक होत आहे.