तरुणाचा रेल्वेच्या इंजिनवर चढून विजेच्या तारेला स्पर्श

संभाजीनगर /प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात एका तरुणाने डेक्कन ओडिसी रेल्वेच्या इंजिनवर चढून विजेच्या तारेला स्पर्श केला. विजेचा प्रवाह शरीरात उतरल्याने तो गंभीररित्या भाजला आहे. रेल्वे पोलिसांनी तातडीने त्याला खाली उतवले आणि उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.

सदर घटना शुक्रवार (17 जानेवारी 2025) सकाळी साडेदहा वाजता घडली. सकाळी साडेदहा वाजता देशी, विदेशी पर्यटकांना घेऊन येणारी डेक्कन ओडिसी ही मुख्य रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दाखल झाली. या रेल्वेमध्ये जवळपास 50 विटेशी पर्यटकांचा समावेश होता. याचवेळी एक 30 ते 32 वय असणारा मनोरुग्ण रेल्वे इंजिनवर चढला आणि त्याने विजेच्या तारांना स्पर्श केला. यामुळे तो गंभीर भाजला आहे. रेल्वे पोलिसांनी त्याला तत्काळ खाली आणले रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन ओडिसी रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी होती. एकीकडे विदेशी पर्यटकांचे स्वागत सुरू होते, तर दुसरीकडे मनोरुग्ण तरुण इंजिनवर चढला आणि त्याने थेट विजेच्या तारेला पकडले. त्यामुळे तो गंभीर भाजला. घटना कळताच लोहमार्ग पोलिस संजय राऊत, रामभाऊ मोहेकर, वैभव सपकाळ, सुनील घुगे, क्षीरसागर, उमेश गायकवाड यांच्यासह रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. इलेक्ट्रिक लाईनचा वीजपुरवठा बंद करून जखमी व्यक्तीला इंजिनवरून खाली उतरविण्यात आले. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा