पालकमंत्र्यांच्या हस्ते नाथसागराचे जलपूजन

पालकमंत्र्यांच्या हस्ते नाथसागराचे जलपूजन

छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी - पैठण येथील नाथसागर हे धरण ९० टक्के भरले असून या जलाशयाचे जलपूजन आज राज्याचे पणन,अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन जलविसर्गाबाबत माहिती घेतली व त्यासंदर्भात काठावरील लोकांमध्ये आगाऊ सुचना देऊन खबरदारी बाळगण्याबाबत जनजागृती करण्याचे व आपत्ती व्यवस्थापन दलास सज्ज राहण्याचे निर्देशही दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, प्रांताधिकारी निलम बाफना, तहसिलदार सारंग चव्हाण, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंत प्रशांत जाधव, अधीक्षक अभियंता समाधान सबीनवार, उपविभागीय अभियंता रायबोले तसेच विलास भुमरे, किशोर अग्रवाल, रमेश पवार यांच्यासह जलसंपदा व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते जलसाठ्यास साडीचोळी, नारळ अर्पण करुन जलपूजन करण्यात आले.

यावेळी माहिती देण्यात आली की, जायकवाडी धरणाचा पाणी साठा जवळपास ९० टक्के इतका झाला आहे. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढणार आहे. आवक विचारात घेऊन धरणामधुन गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावात सतर्कता बाळगणे व संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे,असे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा