शिंदे-फडणवीस सरकारच्या विस्ताराबाबत आमदार संजय शिरसाटांचा मोठं विधान, म्हणाले...
मुंबई: सध्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचा कारभार चालवत आहे. मात्र शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. याच कारणावरुन विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. असे असताना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याचे नेमके कारण सांगितले आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि दुसरीकडे न्यायालयात सुनावणी, हे योग्य नाही म्हणून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, असे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
“मंत्रिमंडळाचा विस्तार एक दोन दिवसांत होणार होता. पण सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे एकीकडे न्यायालयात सुनावणी सुरु आहे आणि दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होतोय, हे चित्र बरोबर नाही असे वरिष्ठ नेत्यांना वाटते. त्यामुळे २० जुलैनंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे मला वाटते,” असे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेतील बंडखोर आमदारांची अपात्रता आणि शिंदे सरकारच्या स्थापनेला आव्हान देणाऱ्या याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. या सर्व याचिकांवर येत्या २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय निरिक्षणं नोंदवतं आणि काय निकाल देतं याकडे राज्यातील सर्वांचंच लक्ष असणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.