हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा खुलताबादला हजारो च्या संख्येने भाविकांची गर्दी

हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा  खुलताबादला हजारो च्या संख्येने भाविकांची गर्दी

खुलताबाद / प्रतिनिधी:  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी हनुमान जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली असून छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातून रात्रीच लाखो भाविक चालत आले.

पहाटे सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.  हनुमान जन्मोत्वानिमित्त पहाटे सहा वाजता ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, माजी खा. चंद्रकांत खैरे, भद्रा मारूती मंदीर देवस्थान चे अध्यक्ष मिठ्ठू पा बारगळ, कचरू बारगळ, किशोर अग्रवाल, पोपट जैन, बाबासाहेब बारगळ , राजू इसराणी, आबासाहेब बारगळ, कैलास बारगळ, ज्ञानेश्वर बारगळ आदीसह विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत महापुजा आरती व जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर येथून पायी येणा-या भाविकांची संख्या मोठी होती. भद्रा हनुमान कि जय म्हणत भाविक दर्शन घेत होते, दिवसभर हनुमान भक्तांनी खुलताबादनगरी दुमदुमली होती.  भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी  सांयकाळपासूनच जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून भाविक खुलताबादेत दाखल होत होते. अहिल्यानगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील भाविक तर पालखीमिरवणुकीने सवाद्य मिरवणूकीने दाखल झाले होते.  छत्रपती संभाजीनगर - खुलताबाद मार्गावर पायी चालत येणा-या भाविकांसाठी ठिकठिकाणी रस्त्यावर चहापाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. - औरंगजेब कबरीकडे जाणारे रस्ते केले बंद औरंगजेब प्रकरणामुळे कडक बंदोबस्त गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेब कबर प्रकरणामुळे मोठे वादळ उठले होते. औरंगजेब कबर उखडून फेकण्याचा इशारा काही हिंदूत्वादी संघटनेने दिल्यामुळे खुलताबाद येथील औरंगजेब कबरीकडे जाणारे रस्ते पोलीस प्रशासनाने लोखंडी अँगल्स व बँरीकेटस लावून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे भद्रा मारूतीच्या दर्शनाला व शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरिक्षक धनंजय फराटे, भद्रा मारूती संस्थानचे सुरक्षाअधिकारी राजेंद्र जोंधऴे व त्यांचे सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  -काल्याचे किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता हनुमान जयंती निमित्त खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता या सप्ताहाची सांगता आज शनिवारी सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या किर्तनाने झाली त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा