शहर सेप्टिक टॅंकमुक्त होणार
संभाजीनगर /प्रतिनिधी - महापालिका प्रशासनाने शहर सेप्टिक टॅंकमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ड्रेनेज लाइन नसलेल्या भागात सुमारे ७५० कोटी रुपये खर्च करून ड्रेनेजलाइन टाकली जाणार आहे.
हे काम २०२७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असून, संपूर्ण शहरात सुमारे २,४०० किलोमीटरचे ड्रेनेजलाइनचे जाळे तयार होणार आहे. सध्या असलेल्या ड्रेनेजलाइनमध्ये ८०० किलोमीटरची भर पडणार आहे.
महापालिकेने काही वर्षांपूर्वी शहरात सुमारे ४६५ कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचे काम केले होते. त्यासाठी केंद्र शासनाच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मीडियम टाऊन्स (यूआयडीएसएसएमटी) या योजनेअंतर्गत निधी देण्यात आला होता. मुख्य सिव्हर लाइनसह शहराच्या चार भागांत एसटीपी प्लांट (जल जल प्रक्रिया प्रकल्प) उभारण्यावर त्यावेळी महापालिकेचा भर होता. असे असले तरी त्यावेळी सुमारे सोळाशे किलोमीटरची ड्रेनेज लाइन टाकण्यात आली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. असे असले तरी निधीअभावी ही योजना अर्धवट गुंडाळण्यात आली.
दरम्यान, शहर परिसरात नव्याने अनेक गुंठेवारी वसाहती अस्तित्वात आल्या. या भागात ड्रेनेज लाइन नसल्याने सांडपाणी रस्त्यावर सोडले जाते. अनेकांनी सेप्टिक टॅंक तयार केले. पण, ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर दुर्गंधीयुक्त पाणी नाल्यांमधून सोडले जात आहे. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहर सेप्टिक टॅंक मुक्त करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय्य ड्रेनेज लाइनचेप्रस्ताव तयार केले.
त्यानुसार केंद्र शासनाच्या अमृत २ योजनेतून शहराला सुमारे ७५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून काम सुरू करण्यात आले आहे. येत्या काळात सुमारे आठशे किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील ड्रेनेज लाइनचे जाळे २४०० किलोमीटरपर्यंत विणले जाईल असे सूत्रांनी सांगितले. यामुळे शहरवासीयांची समस्येतून सुटका होणार आहे.
२०२७ पर्यंत चालणार काम
सातारा-देवळाई भागासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. हे काम सध्या प्रगतिपथावर आहे. त्यासोबतच नव्याने पश्चिम विधानसभा मतदारसंघातच कामे सुरू होणार आहेत. पूर्व, मध्य व फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महापालिका हद्दीतील वॉर्डात ड्रेनेजची कामे होणार आहेत. ही कामे २०२७ पर्यंत चालणार आहेत.