Aditya Thackeray : “लिहून घ्या, हे सरकार कोसळणार,” आदित्य ठाकरेंचे मोठे विधान
मनमाड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे १२ खासदारदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. असे असताना शिवसेना पक्षाची जबाबदारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा तसेच शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. आज मनमाड दौऱ्यावर असताना त्यांनी विद्यमान सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे सरकार कोसळणार आहे, असे खळबळजनक विधान केले आहे.
शिवसैनिकांना उद्देशून बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकार लवकरच कोसळेल असा दावा केला. “हे सरकार बेकायदेशीर पद्धतीने बनवले गेले आहे. हे सरकार कोसळणार आहे, हे तुम्ही लिहून घ्या. हे थोड्या दिवसांचे सरकार आहे. हे सरकार गद्दारांचं आहे. हे तात्पुरतं सरकार आहे” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“हे चाळीस लोक (शिवसेनेचे बंडखोर आमदार) नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. माझ्या चेहऱ्यावर स्वभिमान होता, हसू होतं. कारण मी यांच्यासारखा बेईमान झालो नाही. गुंडगिरीचा काळ गेला. लोकांची सेवा करा, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. पण लोकांना फसवत राहिलात, खोटं बोलत राहिले तर हेच लोक तुम्हाला गाडतील,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाच्या काळात राज्याची जमेल त्या मार्गाने सेवा केली, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. “त्यांच्या (बंडखोर आमदारांच्या) चेहऱ्यावर हसू नव्हतं. आम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही? जेवढा विश्वास ठेवायचा तेवढा ठेवला. जेवढं प्रेम दायचं तेवढं दिलं. पण उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय चुकलं, हा विचार मी करतो. आम्ही राजकारण करु शकलो नाही. आम्ही राजकीय नेत्यांसारखे वागलो नाही. आम्ही विरोधी पक्षाला संपवलं नाही. स्वत:च्या आमदारांवर आम्ही लक्ष ठेवलं नाही, हे आमचं चुकलं. आपण प्रत्येक ठिकाणी राजकारण विसरुन लोकांची सेवा केली आहे. उद्धव ठाकरेंनी प्रत्येक तास आणि अडीच वर्षातील प्रत्येक क्षण लोकांच्या सेवेसाठी दिला होता,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.