इम्तियाज जलील यांना ५ वर्षांनंतरच माहिती होईल यंत्रणा काय असते, रावसाहेब दानवेंचा टोला
औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतराला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यापेक्षा येथे विकासकामे करावीत, अशी मागणी जलील यांनी केलेली आहे. तसेच सध्या राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. जलील यांच्या याच टीकेला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जलील यांना पाच वर्षे संपल्यानंतर यंत्रणा काय असते याची माहिती होईल, अशी खोचक टीका दानवे यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात शिंदे सरकारची स्थापना झालेली असली तर अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरही दानवे यांनी भाष्य केले. “मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. त्यांची चिंता करू नये. ही काळजी आमची आहे. आम्ही राज्याला वाऱ्यावर सोडलेले नाही. अतिवृष्टी तसेच इतर मदतीसाठी आम्ही कोठेही कमी पडणार नाही,” असे आश्वासन दानवे यांनी दिले आहे.
“दिल्ली ही देशाची राजधानी आहे. जेव्हा महाराष्ट्र संकटात आलेला आहे, तेव्हा सारेच मुख्यमंत्री दिल्लीत जातात. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेदेखील दिल्लीला गेले होते. अजित पवारदेखील गेलेले होते. दिल्लीला कोण जात नाही. आमच्याच मुख्यमंत्र्यांवर टीका का केली जात आहे,” असा सवालही दानवे यांनी केला.