पाऊस ठरवणार आता महापालिका निवडणुकीची तारीख
औरंगाबाद/प्रतिनिधी - मागील सुनावणीदरम्यान महापालिका इलेक्शन लवकरात लवकर जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पावसामुळे निवडणुका घेणे अवघड जाईल त्यासाठी न्यायालयाने योग्य निर्देश देण्याची मुभा द्यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल केली होती. आज झालेल्या सुनावणीदरम्यान ज्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस असेल त्या ठिकाणी निवडणुका घ्यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कधी निवडणुका होतील हे आता पावसावर अवलंबून आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर विशेष अर्ज सादर करून येणाऱ्या मान्सूनमुळे राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद व पंचायत यांच्या निवडणुकीची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यांपूर्वी पार पडणे शक्य नसल्याने त्याविषयी योग्य ते निर्देश व मुभा राज्य निवडणूक आयोगास देण्यात यावी अशी विनंती केली होती. सदर अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयासमोर सविस्तर सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने असे प्रतिपादन केले की ज्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा अधिक प्रभाव नाही त्या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
त्यावर सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की अशाप्रकारे प्रक्रिया सुरू केल्यानंतर भविष्यामध्ये जिल्हानिहाय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय निवडणूक कार्यक्रमांमध्ये परिस्थितीनुरूप योग्य तो बदल राज्य निवडणूक आयोग करू शकेल. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी आता 12 जुलै 2022 रोजी होणार आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. सुधांशू चौधरी, ॲड. देवदत्त पालोदकर, अॅड. आडगावकर तर राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲड. गौरव अग्रवाल यांनी काम पाहिले