माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी
माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरू केली होती. सातत्याने त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. सोमय्या यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट दिली होती. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आपासाहेब नलवडे कारखान्यामधील झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हे प्रकरण आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणाचे आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आपला काही संबंध नाही असं म्हटलं होतं.
माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला काही समजण्या अगोदरच अधिकाऱ्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला आणि छाप्यास सुरुवात केली. बंगल्याच्या चारी बाजूने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी बंदोबस्त झालेले सर्व पोलीस दिल्ली पोलिस दलातील आहेत.
यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी
जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागानं केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागानं छापा टाकला होता.