आमदारांच्या घरासाठी भिकमागो आंदोलन

आमदारांच्या घरासाठी भिकमागो आंदोलन

औरंगाबाद /प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आमदारांना घरे बांधून देण्याची घोषणा केल्याने राज्यातील नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या या निर्णयाच्या विरोधात जिल्ह्यातील कन्नडमधील राष्ट्रवादी काँग्रेसनेच आंदोलनाचा इशारा दिला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. या बॅनरची नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. कन्नडच्या आमदारांना मुंबईत घर देण्यासाठी भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गरीबांना घरकुल मिळो अथवा न मिळो, पण आमदारांना घर मिळण्यासाठी भीकही मागायची तयारी आहे, असा उपहासात्मक अर्थाचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात सोमवारी आंदोलन करणार असल्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात बॅनरबाजी केली आहे. मला मुंबईत घर द्या हो. अशी व्याकुळ मागणी आमदारांची असून त्यांच्यासाठी भिक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. येत्या सोमवारी आमदारांची मागणी पूर्ण करण्यासाठी अधिकारी, गुत्तेदार व तालुक्यातील अवैध धंदेवाले यांच्याकडे आंदोलन करणार असल्याचा इशारा या बॅनरवर देण्यात आला आहे. कन्नड शहरातील प्रमुख चौकात तसेच प्रमुख रस्त्यांवर हे बॅनर लावण्यात आले आहे. सध्या हे बॅनर राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.

.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा