शिवसेनेच्या 12 खासदारांना संजय राऊतांचा इशारा,म्हणाले...

शिवसेनेच्या 12 खासदारांना संजय राऊतांचा इशारा,म्हणाले...

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे १२ खासदारदेखील बंडखोरीच्या मार्गावर आहेत. १२ खासदार मंगळवारी (१९ जुलै) शिंदे गटात सामील होणार आहेत. अशी चर्चा सुरु झाली आहे. खासदार बंडखोरी करण्याचा प्रयत्न करत असतील, तर शिवसेनेतर्फे कायदेशीर आव्हान दिले जाईल, असे शिवसेनेचे (ShivSena Mp) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले आहे. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“विधिमंडळात बंडखोरी झाली. त्याला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. जर लोकसभेमध्ये कोणी असा प्रकार करणार असेल, तर त्याला कायदेशीर आव्हान दिले जाईल. कोणी असा प्रयत्न करत असेल, तर त्यांना फुटीरच म्हणावे लागले. लोकसभेतील शिवसेना ही या क्षणी एकसंध आहे, असे आम्ही मानतो,” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

 तसेच पुढे बोलताना त्यांनी खासदारांची कथित बंडखोरी म्हणजे कॉमेडी एक्स्प्रेस सीझन २ आहे, अशी मिश्किल टिप्पणी केली. “माझी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. शिवसेना खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चेनंतर लोकसभेतील गटनेते विनायक राऊत, लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद राजन विचारे, अरविंद सावंत, प्रियांका चतुर्वेद, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर हे ताबडतोब माझ्याकडे आले. आणखी काही खासदार माझ्याकडे येत आहेत. खासदारांच्या बंडखोरीचा प्रकार म्हणजे कॉमेडी एक्स्प्रेस सीझन २ आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटाने शिवसेनेची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. यावरेदेखील राऊत यांनी भाष्य केले आहे. “कॉमेडी एक्स्प्रेस सीझन १ विधिमंडळात झाले आहे. यासंदर्भात येत्या २० तारखेला न्यायालायात सुनावणी सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्थापन केलेल्या खंडपीठासमोर फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय लागेल. १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील शिवसेनेची याचिका कायद्याच्या कसोटीवर टिकणारी आहे. जो न्याय मिळायचा आहे, तो आम्हाला मिळेल. या निर्णयाच्या भयाने फुटीर गटाने शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. या फुटीर गटाला पक्ष म्हणून मान्यता नाही. हा फुटीर गट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतो आणि स्वत:ची कार्यकारिणी जाहीर करतो. याच कारणामुळे हे सर्व कॉमेडी एक्स्प्रेस सीझन २ आहे,” असे राऊत म्हणाले.

 शिवसेना हा नोंदणीकृत राजकीय पक्ष…

 “स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी ही धडपड सुरु आहे. पण जे सोडून गेलेले आहेत, त्यांच्याशिवाय शिवसेना भक्कम उभी आहे. आगामी काळात शिवसेना पक्ष आणखी भक्कम होईल. शिवसेनेचे नेतेमंडळ हे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या कार्यकारिणीने निर्माण केलेले आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून नेमले गेलेले आहेत. शिवसेना हा नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाहीये. ही मूळ शिवसेना आहे. अनेकांनी फुटून जाऊन बाहेर पक्ष स्थापन केले असतील. पण आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा त्यांना अधिकार नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा