ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराडांकडून नॅशनल बँकेचे गाजर
औरंगाबाद : वडगाव कोल्हाटी - बजाजनगर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत पॅनलच्या प्रचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत जर भाजपाच्या ताब्यात दिली, तर गावात नॅशनल बँक आणण्याचे आश्वासन कराड यांनी पत्रकार परिषदेत दिले.
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत परिवर्तन ग्रामविकास पॅनल ची स्थापना करून भाजपाने पहिल्यांदा वडगाव कोल्हाटी - बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत आपले 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहे. कोणत्याही परिस्थितीत ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात यावी. यासाठी भाजपाने कंबर कसत शहरातील 17 पेक्षा जास्त नगरसेवक आणि दहा पेक्षा जास्त पदाधिकारी यांना कामाला लावत त्यांना बजाजनागर येथे मुक्कामाचे आदेश दिले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय राज्य अर्थमंत्री हे चक्क बजाजनगरात अवतरले आणि त्यांनी बजाज नगराच्या विकासासाठी काय काय करणार याचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी गार्डन, ड्रेनेज लाईन, शिवस्मारक, गॅस पाईप लाईन, शुद्ध पाणी पुरवठा, आणि मालमत्ताचे पी आर कार्ड देण्यासह अनेक विकास कामांची घोषणा केली. मात्र याला एकच अट दिली, जर भाजपाच्या पॅनलला विजयी केले तरच. यावेळी बोलताना भागवत कराड यांनी सांगितले की, जर भारतीय जनता पक्षाचे पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले तर वडगाव कोल्हाटी बजाजनगर येथे नॅशनलाईज बँक मी आणणार. असे गाजर यावेळी दाखवण्यात आले.
तसेच गेली अनेक वर्षे येथे सेनेची सत्ता आहे त्यांना दूर करा असे आवाहन केले. पण सध्या मित्र पक्ष असलेल्या आ. संजय शिरसाठ याचे सुद्धा पॅनल आहे. यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपण कोणत्या सेनेला सत्तेतून बाहेर काढा असे म्हणतात तुमच्या नजरेत सेना कोण आहे तर यावेळी ते थांबून म्हणाले संजय शिरसाठ यांनाच आम्ही सेना मानतो. अशी माहिती त्यांनी बजाज नगरातील नागरिकांना दिली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना कदाचित माहिती नसेल की, बजाजनगरात जवळपास सर्वच नॅशनल बँकांच्या शाखा आहे.