खैरचा पराभव का झाला? सेनेची शोध मोहीम

खैरचा पराभव का झाला?  सेनेची शोध मोहीम
Chandrakant khaire

औरंगाबाद / प्रतिनिधी : शिवसेनेच्या हातून २०१९ ची लोकसभेची जागा गेली, याचे शल्य पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असून ही जागा कशामुळे गेली, याचा आढावा घेण्यासोबतच जिल्ह्यात पक्ष संघटनेत काय उणीवा आहेत, यासाठी २७ जणांच्या टीमसह पक्षसचिव खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. यात आपल्याच लोकांनी आपलाच घात केल्याने लोकसभेत पक्षाचा पराभव झाल्याचा अभिप्राय मुंबईहून आलेल्या निरीक्षकांनी तयार केला असून तो पक्षप्रमुखांना गोपनीयरीत्या देण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार मराठवाड्यात २४० जणांचे पथक मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला.

संपुर्ण जिल्ह्यात मोहीमे व्यतिरिक्त निरीक्षकांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. संघटनेत जातीवाद शिरल्यामुळे सोशल इंजिनिअरींग कोलमडू लागले आहे. याकडे अनेकांनी लक्ष वेधले. संघटनेतील गटबाजी, जातीवाद, शिवसैनिकांना उपजीविकेचे साधन नसल्यामुळे अनेक जण दुरावत चालले आहेत. पक्षाची यंत्रणा सक्षम आहे; परंतु काही अडचणी आहेत. वैयक्तिक ऐवजी संघटनेबाबतची मते निरीक्षकांनी ऐकून घेतली. उशीरा का होईना पक्षाने चार दिवसांत ग्राऊंड रिपोर्ट तयार केला आहे. मराठवाड्यानंतर पश्चिम, उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेण्यात येणार आहे.

शिवसंपर्क मोहीम समारोपाप्रसंगी खा. विनायक राऊत यांनी पक्षाचा झेंडा महाराष्ट्रात फडकत राहण्यासाठी लढण्याचे आवाहन केले. यावेळी माजी खा. चंद्रकांत खैरे, राजू वैद्य, संतोष जेजुरकर यांनी मार्गदर्शन केले. नंदकुमार घोडले, राजेंद्र जंजाळ, कला ओझा, सुनीता आऊलवार, प्रतिभा जगताप, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, संतोष खेंडके, मकरंद कुलकर्णी, वीरभद्र गादगे, चंद्रकात गवई आदींची यावेळी उपस्थिती हाेती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा