केंद्र सरकार विरोधातील संघर्षात काँग्रेस पक्ष छोटे व्यापारी व दुकानदारांसोबत
मुंबई : केंद्र सरकारच्या (Central Government) चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने महागाई गगनाला भिडली असताना केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) जीवनावश्यक वस्तूंवर ५% जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील होणार आहे. या जुलमी निर्णयाविरोधात राज्यातील व्यापारी, दुकानदार रस्त्यावर ऊतरले असून, संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या संघर्षात काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत असून, ‘जीएसटी (GST) विरोधाताल व्यापारी आंदोलनास’ आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, आठ वर्षापूर्वी १०० दिवसांत महागाई कमी करू असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या आठ वर्षाच्या कार्यकाळात महागाई कमी होण्याऐवजी बुलेट ट्रेनच्या स्पीडने वाढत आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ४५० रुपये होता तो आज १ हजार ५० रूपयांहून महाग झाला आहे. युपीए सरकारच्या काळात पेट्रोल ६५ रुपये लिटर होते ते आज ११० रुपये लिटर झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भावही दुप्पट झाले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे स्वप्न सुद्धा स्वप्नच राहिले. देशातील बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील ऐतिहासीक उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. १.२५ कोटी महिलांनी रोजगार गमावले तर जवळपास ४ कोटी परुषांचे रोजगारही गेले आहेत.
केंद्र सरकारने चुकीच्या, मनमानी पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी केल्यायामुळे महागाई तर वाढली आहेच पण छोटे व्यापारी आणि दुकानदार उद्धवस्त झाले आहेत. देशाच्या इतिहासात कधी नव्हे ते शेतीसाठी लागेणा-या यंत्रांवर आणि खतांवर कर लावण्यात आला. आता तर रुग्णालयाच्या बेडवर ५ टक्के, हॉटेलच्या खोलीवर १२ टक्के, तर पनीर, दूध, दही, लस्सी, ताक, आटा तांदूळ, गहू, बाजरी यावरही ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. अगोदरच महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे महाग झाले असताना जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्यामुळे गरीबांनी खायचे काय? असा प्रश्न पडला आहे. जीएसटीमुळे छोटे व्यापारी आणि दुकानदारांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. केंद्र सरकारने अन्यायी पद्धतीने लावलेला ही जीएसटी तात्काळ मागे घ्यावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.