संजय राऊतांवरच्या ईडी कारवाईवरून अंधारेंचा इशारा, म्हणाल्या
पुणे : पक्षासाठी छातीचा कोट करून ईडी, सीबीआय या सगळ्यांशी लढणारे, मरण पत्कारेन पण शरण पत्करणार नाही, हा लढाऊ स्वाभिमानी बाणा जपणारे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आज ईडीने कारवाई केली. सुरुवातीला तब्बल नऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर शिवसैनिक (Shivsainik) आक्रमक झाले आहेत. सुषमा अंधारे यांनी ईडीच्या संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संसदीय लोकशाहीवरील हा हल्ला असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. तर ज्याप्रमाणे संजय राऊत स्वतः लढत आहेत, त्यावरून त्यांच्यावर अटॅक होणे हे स्वाभाविक होते, असेही अंधारे म्हणाल्या.
‘आम्ही संविधानाला मानणारे लोक’
आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत म्हणून संजय राऊत साहेबांनी सकाळपासून कारवाईला सहकार्य केले. याचा अर्थ असा नाही, की शिवसेना शांत बसणारी आहे. जर आम्हाला मातोश्रीवरून आदेश मिळाले, तर महाराष्ट्राचे वातावरण काय होईल, हे सांगायची आम्हाला गरज नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास म्हणून न्यायालयीन लढा द्यायची तयारी ठेवली आहे. शिवसेना हा पक्ष संजय राऊत साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे, असा विश्वास सुषमा अंधारेंनी व्यक्त केला आहे.
‘शिवसैनिक प्राणपणाने लढत राहील’
या देशातील न्यायव्यवस्थेवर आणि स्वायत्त यंत्रणांवरील विश्वास कायम राहिला पाहिजे आणि ही एकूण प्रक्रिया पार पडली पाहिजे, असा आमचा विश्वास आणि समज असल्यामुळे आम्ही ही न्यायालयीन लढा लढण्याची तयारी ठेवली आहे. तर ज्या पद्धतीने ईडीच्या कार्यालयात जाताना राऊत साहेबांनी भगवा फडकवत ठेवला, तो फडकत राहणारा भगवा अखंड महाराष्ट्रावर असाच फडकत राहण्यासाठी प्रत्ये शिवसैनिक प्राणपणाने लढत राहील, असे अंधारे यांनी सांगितले.
संजय राऊत ईडीच्या ताब्यात
सकाळपासून नऊ तास चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतले आहे. त्यावेळी संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले. कारवाई केवळ सूडनाट्यातून करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या भांडुपच्या राहत्या घरातून ईडीने ताब्यात घेतले. तर अशा या सगळ्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक आपल्या पाठीशी असल्याचे राऊत म्हणाले.