क्विक स्टार्ट-२४ कंपनीचा 35 कोटीचा घोटाळा उघड
संभाजीनगर/ प्रतिनिधी - क्विक - क्विक स्टार्ट-२४' या कंपनीने शेकडो लोकांना वेगवेगळे अमिष दाखवून 35 कोटीचा गंडा घातला आहे. या कंपनीत पैसे गुंतविल्यास प्रतिमहिना 3 टक्के लाभासह परदेशी सफरीचे अमिष दाखवण्यात आले.
दि.१७ मार्च ते दि. २८ सप्टेंबर २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणात कंपनीच्या दोन मालकांसह जिन्सी पोलिस ठाण्यात दोन शाखा व्यवस्थापकांवर गुन्हा नोंद झाला. दोघा शाखा व्यवस्थापकांना शुक्रवारी रात्री अटक झाली. याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त उपअभियंता सरताजसिंग अरजनसिंग चहल (वय ६१, रा. म्हाडा कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा. चहल यांचे बचत खाते हे एका सहकारी बँकेच्या पुंडलिकनगर शाखेत आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये चहल संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाला भेटले. त्यांनी क्विव स्टार्ट २४ ग्रुपमध्ये (इनलाइफ कॅपशुअर एलएलपी कंपनी) रक्कम गुंतविल्यास ते प्रतिमहिना ३ टक्के लाभांश देतात, असे सांगितले. शिवाय स्वत:च्या खात्याचे पुस्तक दाखविले. चहल यांना त्यांच्यावर विश्वास बसला.
त्यानंतर त्या व्यवस्थापकाने जालना रोडवरील कंपनीच्या शाखेची व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे (वय ३२, रा. सिडको एन-२) हिच्याशी भेट घालून दिली. तिने चहलला कंपनीची सविस्तर माहिती देत हर्षल योगेशभाई गांधी आणि प्रतीक एम. शहा (दोघे रा. गणेश प्लाझा, अहमदाबाद गुजरात) हे दोघे कंपनीचे मालक असल्याचे सांगितले; तसेच कंपनीची आणखी एक शाखा सिडको एन-७ येथे असून, त्याचे व्यवस्थापक विठ्ठल भागाजी तांदळे (वय ६२, रा. सुरेवाडी, जाधववाडी) असल्याची माहिती दिली. कंपनीमध्ये लोकांनी गुंतविलेली रक्कम ही इतर २४ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.
मिळालेल्या नफ्यावर गुंतवणूकदारांना दर महिन्याला तीन टक्के लाभांश आणि विदेश टूर देते, असे आमिष दाखविले. परतावा भेटत नसल्याने चहल यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंपनीचे गांधी आणि शहा (दोघे रा. गणेश प्लाझा, अहमदाबाद गुजरात), एन-७ सिडकोच्या शाखेचा व्यवस्थापक तांदळे (वय ६२, रा. सुरेवाडी, जाधववाडी) आणि जालना रोडवरील शाखेची व्यवस्थापक मोतिंगे यांच्यावर गुन्हा नोंद झाला. यापैकी तांदळे आणि मोतिंगे यांना अटक केली. दोघांना ता. २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात सहायक सरकारी लोकाभियोक्ता आशिष दळे यांनी काम पाहिले.
परतावा येणे बंद
चहल यांनी गुंतविलेल्या पैशांवर सहा-सात महिने परतावा आला. त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यावर केवळ दोन, तर कोणाचा एकच परतावा आला. चहल कंपनीच्या कार्यालयात गेले, तेव्हा कंपनीचे कार्यालय एन-९ सिडको परिसरात शिफ्ट झाल्याचे चहल यांना समजले. तेथे मोतिंगे आणि तांदळे दोघे भेटले, त्यांनी पैसे परत मिळतील काळजी करू नका, असे म्हणून वेळ मारून नेली. त्यानंतर चहल यांनी कंपनीच्या मालकांना फोन केला.
मात्र, त्यांचे मोबाइल बंद येत होते. त्याचदरम्यान मोतिंगे हिच्याकडे अशाच प्रकारे सात-आठशे लोकांनी, तर तांदळे याच्याकडे पाचशे लोकांनी गुंतवणूक केली असून, त्यांनी त्यांनाही बनावट अग्रिमेंट करून देत सुमारे ३५ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले.
चहल कुटुंबीयांचे २१.५० लाख
चहल यांना कंपनीवर विश्वास बसला आणि त्यांनी १५ मार्च २०२३ ला एक लाख रुपये कंपनीच्या खात्यावर टाकले. त्यांचे अग्रिमेंट झाले, त्यानंतर चहलने मुलगी हरनीष कौर, मुलगा अमनज्योतसिंग, पत्नी जसमित कौर, बहीण परमिंदर कौर आणि भाचा तरणज्योत सिंग रतन अशा सहा जणांचे एकूण २१ लाख ५० हजार रुपये १२ महिने १० दिवसांसाठी कंपनीच्या बँक खात्यावर टाकले.