सामाजिक गुलामगिरीच्या माध्यमातून फॅसीझम लादायचा आहे - प्रा. जयदेव डोळे
औरंगाबाद / प्रतिनिधी : सामाजिक गुलामगिरीच्या माध्यमातून फॅसीझम लादण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. आरक्षणाच्या विरोधात वातावरण निर्मिती सुरू असून लाखो पदे रीक्त ठेऊन बेरोजगारीही जाणीवपूर्वक वाढवण्यात येत आहे. विविध धर्माचा प्रेम या संकल्पनेवर विश्वास आहे मात्र फॅसिझम प्रेमा ऐवजी द्वेषाची भाषा करतो, तिरस्काराची भाषा समाजात पसरवतो" असे प्रतिपादन प्रा. जयदेव डोळे यांनी येथे केले. सामाजिक कार्यकर्ते बुद्धप्रिय कबीर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. "श्रमिक विश्व: बुध्दप्रिय कबीर विशेषांक प्रकाशन" व अभिवादन सभेनंतर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून डोळे बोलत होते.
चर्चासत्राचे प्रास्ताविक करताना श्रमिक विश्वचे संपादक व आजच्या कार्यक्रमाचे संयोजक कॉम्रेड प्रा.राम बाहेती यांनी धर्मांध व फॅसिस्ट शक्तीचे हल्ले तीव्र होत असताना जात -वर्ग व स्त्रीदास्य अंतासाठी संघर्ष करणाऱ्या विविध शक्तींनी आपला लढा एकजुटीने पुढे नेण्याची आवश्यकता आहे व हीच बुद्धप्रिय कबीरला खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन केले. कम्युनिस्टांच्या बद्दल गैरसमज पसरणाऱ्या व परिवर्तनवाद्यामध्ये भिंती उभ्या करणाऱ्या पासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.चर्चासत्राचे सूत्रसंचालन कॉ.अभय टाकसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉ.तारा बनसोडे यांनी केले.
फॅसिझम वर झालेल्या या चर्चासत्रापूर्वी पहिल्या सत्रात बुद्धप्रिय कबीर यांचे जीवन व कार्य यावर काढण्यात आलेल्या मासिक श्रमिक विश्व विशेषांकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला व अभिवादन सभाही यावेळी झाली. ॲड. बी. एच. गायकवाड, डॉ. प्राचार्य वैशाली प्रधान, डॉ. रेखा मेश्राम, डॉ.शेखर मगर, के.ई. हरिदास, कॉ.भगवान भोजने, कॉ.भास्कर लहाने, कॉ.विकास गायकवाड, कॉ.सुखदेव बन बुध्दप्रियची आई कांताबाई अर्जुन उबाळे यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.