आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला लोकांचा भरभरून प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला लोकांचा भरभरून प्रतिसाद

संभाजीनगर /प्रतिनिधी - दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सिनेरसिकांनी नावाजलेले चित्रपट पाहिले. गुरुवारी मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धेतील तीन लघुपट आणि तीन विशेष लघुपट दाखविण्यात आले.
महोत्सवाची ओपनिंग फिल्म असणारी लिटल जाफना आणि पद्मभूषण सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला 'साझ' या चित्रपटाचाही यात समावेश होता. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना दोन महत्त्वपूर्ण मास्टरक्लास ऐकायला मिळाले. तसेच, पद्मभूषण सई परांजपे आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी महोत्सवात उपस्थित राहत चित्रपट पाहिले.

दुसऱ्या दिवशी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांचे प्रदर्शन झाले. प्रोझोनच्या तीन स्क्रीनवर हे सिनेमे होते. चाहत्यांनी आपापल्या आवडीनुसार सिनेमांची निवड केली. गुरुवारी स्क्रीनिंग झालेले बहुतांश चित्रपट हे परकीय भाषेतील असली तरीही हे चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. इकडे मास्टर क्लासनंतर चाहत्यांनी आशुतोष गोवारीकर यांना वेढले. आशुतोष यांनीही कुणाला नाराज न करता प्रत्येकालाच संधी देत फोटो काढू दिले.

सैफविषयी सहानुभूती, मात्र...

मास्टर क्लासनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आशुतोष गोवारीकर यांना सैफ अली खान आणि सेलिब्रिटींची सुरक्षा याविषयी विचारण्यात आले. 'सैफवर झालेला हल्ला दुर्दैवी आहे. तो लवकर बरा व्हावा, असे वाटते. मी त्याच्या कुटुंबीयांसोबत आहे.
पण, मी इथे चित्रपट महोत्सवात आहे. तिकडे नेमके काय घडले हे मला माहीत नाही. अशावेळी या घटनेवरून सुरक्षेबाबत बोलणे योग्य ठरणार नाही. एका घटनेवरून आपण थेट सेलिब्रिटींच्या सुरक्षेवर बोलावे, असे मला वाटत नाही', असे गोवारीकर म्हणाले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा