वैजापूर तालुक्यात बिबट्याचा हल्ला
संभाजीनगर / प्रतिनिधी - वैजापूर तालुक्यातील कविटखेडा-बिरोळा शिवारात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास आईसोबत कापूस वेचणीसाठी शेतात गेलेल्या ९ वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. महेश सिद्धार्थ आखाडे (मूळ रा. बडवाणी मध्यप्रदेश) असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.
याप्रकरणी शिऊर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील शेतकरी मच्छिंद्र काशिनाथ चव्हाण यांच्या गट न. १३३ मधील शेतात कापूस वेचणीचे काम सुरू होते. मृत महेश हा आईसमवेत शेतात आला होता. दरम्यान महेश गायब झाल्याचे आईच्या निदर्शनात आले. यानंतर शेतातील परिसरात शोध घेत असतानाच काही अंतरावर महेश मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व महेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.
गेल्या महिनाभरात शिऊरसह, लोणी, गारज परिसरात बिबट्याने २ ते ३ पुरुष व महिला, ३ बालकांसह अनेक जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून साांगितल्या जात आहेत