लोकशाहीच्या संरक्षण व विकासात नागरिकांची सजगता व विवेक महत्त्वाचा - डॉ पुरुषोत्तम अग्रवाल

लोकशाहीच्या संरक्षण व विकासात नागरिकांची सजगता व विवेक महत्त्वाचा - डॉ पुरुषोत्तम अग्रवाल

संभाजीनगर / प्रतिनिधी -  विवेकानंद महाविद्यालयात संपन्न होत असणाऱ्या तीन दिवसीय विवेकानंद व्याख्यानमालेतील तिसरे व अंतिम पुष्प भारतीय भाषा व साहित्याचे इतिहासकार तथा साहित्य अकादमी भाषा सन्मान प्राप्त नामवंत लेखक-विचारवंत प्रा.डॉ.पुरुषोत्तम अग्रवाल यांनी गुंफले. 
    "भारतीय समाज आणि लोकशाही" या विषयावर मांडणी करताना डॉ. पुरुषोत्तम अग्रवाल म्हणाले की, भारतातील लोकशाहीची पाळेमुळे अतिप्राचीन काळापासून आहेत. ब्रिटिशपूर्व काळातील हिंदू व मुस्लिम दोन्ही शासन काळामध्ये लोकहित व लोक भावना महत्त्वपूर्ण होत्या. राजा असो किंवा राज्य दोघांच्याही अधिकारांपेक्षा त्यावरील मर्यादांची व जबाबदारींची चर्चा अधिक होती. व्यक्तीच्या जीवनातील राज्याचा हस्तक्षेप हा अत्यंत मर्यादित होता. भारतामध्ये असणारी सामाजिक, धार्मिक, प्रादेशिक विविधता ही या लोकशाहीचा ऐतिहासिक व नैसर्गिक स्रोत आहे. तथापि, लोकशाही संख्येचा खेळ आहे, असे मानण्यापेक्षा लोकशाहीमध्ये संस्था व त्यावरील मर्यादा अधिक महत्त्वपूर्ण असतात, हे समजून घेतले पाहिजे. आजघडीला लोकशाहीच्या बुरख्यामध्ये हुकूमशाही व्यवस्था चोरपावलांनी येत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. लोकांच्या भावना अत्यंत संवेदनशील व आक्रमक होत असून या टोकदार भावनांचा अनादर झाल्यास त्याचे पर्यावसान हिंसाचारात होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या मीडियाची भूमिका अत्यंत संदिग्ध व हतबल होत असल्याने लोकशाहीच्या संरक्षणासाठी नागरिकांचा विवेक व सजगता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो, हे त्यांनी आवर्जून नमूद केले. व्याख्यानानंतर नागरिकांकडून आलेल्या अनेक प्रश्न व शंकांचे निरसन डॉ. पुरुषोत्तम अग्रवाल यांनी केले.

यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव श्रीमंतराव शिसोदे, संस्थेचे सचिव डॉ. यशोद पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी  प्रभाकर मोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ वांजरवाडे यांनी तर आभार  डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी मानले. व्याख्यानमालेसाठी शहरातील नागरिक व श्रोते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा