ऑनर किलिंग चा पुन्हा एक बळी
संभाजीनगर /प्रतिनिधी - मुळातच गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या चुलत भावाने अल्पवयीन बहिणीने आंतरजातीय मुलाशी प्रेम केले म्हणून तिला डोंगरावरून ढकलून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना दि.6 जानेवारी रोजी दुपारी संभाजीनगरतील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडली.
मृदा मुलीचे नाव नम्रता गणेशराव शेरकर (१७ वर्ष, रा. शहागड, श्रीराम कॉलनी ता. अंबड जि.जालना) असे असून तिची हत्या करणाऱ्या चुलत भावाचे नाव ऋषिकेश तान्हाजी शेरकर (वय, २५ रा. वळदगाव ) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नमृताचे गावाकडे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण होते. दरम्यान काही दिवसापूर्वी ती घर सोडून गेली होती. यामुळे घरच्यांनी पाच -सहा दिवसापूर्वी नम्रताला वळदगाव येथे राहणाऱ्या चुलत्याकडे पाठवले होते. आज (सोमवारी) नम्रताचा चुलत भाऊ ऋषीकेश नम्रताला बाहेरून जाऊन येवू, असे म्हणून तो तिला खवड्या डोंगरावर घेऊन गेला. याठिकाणी तिच्यासोबत गप्पा मारता-मारता ऋषिकेश याने नम्रताला डोंगरावरून खाली ढकलून दिले. जवळपास २०० फुटावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बन, जमादार बाळासाहेब आंधळे, पोलीस अंमलदार राजाभाऊ कोल्हे, मनोज बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शिवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला असून संशयित आरोपी ऋषीकेश शेरकर यास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
१७ वर्षीय नम्रता शेरकर व तिचा प्रियकर वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघेही गावातून पळून गेले होते. त्यांना शोधून आणून कुटुंबियांनी नम्रताची समजूत घातली होती. मात्र नम्रता ऐकत नसल्याने घरच्यांनी तिला वळदगाव येथे तिच्या चुलत्याकडे पाठविले.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ऋषिकेशवर अनेक गुन्हे दाखल
नम्रताचा चुलतभाऊ ऋषीकेश उर्फ वैभव हा गुन्हेगारी प्रवृतीचा असून त्याच्याविरुध्द सातारा पोलीस ठाण्यात मारामाऱ्या करणे, प्राणघातक हल्ले करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये तो हर्सूल जेलची हवा खावून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.