आमदार अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदेंचा मलाही फोन आला होता,पण...
औरंगाबाद : 'मी तुझ्यासाठी हे केलं, ते केलं, असे सांगणारे फोन तुम्हाला येतील. पण कुणी तुमच्यावर उपकार करीत नाही. मलाही एकनाथ (Eknath Shinde) यांचा फोन आला होता. मला म्हणाले 'मी तुझ्यासाठी हे केले, ते केले', पण मी उत्तर दिले 'शिवसेना (ShivSena) म्हणून केले. उपकार नाही केले, मी बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे 'शिवसंवाद' यात्रेच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या अनुषंगाने औरंगाबादेत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आ. दानवे यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, ४० आमदारांपाठोपाठ १२ खासदारांनीदेखील उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. हे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले असून बंडखोर खासदारांनी गटनेता बदलण्याची केलेली मागणी लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी या बंडखोर खादारांच्या गटाला शिवसेनेचा वेगळा गट म्हणून मान्यता दिली आहे. खासदार राहुल शेवाळे यांना गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली आहे.