'भाभीजी घरपर है' फेम मलखानचं निधन
मुंबई : मनोरंजनसृष्टीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'भाभीजी घरपर है' मलखान फेम अभिनेता दीपेश भान याचं आकस्मिक निधन झालं आहे. या तरुण अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजनसृष्टी पुन्हा एकदा हादरली आहे. या मालिकेचे अस्टिस्टन्ट डिरेक्टर अभिनीत यांनी या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपेश शुक्रवारी क्रिकेट खेळत होता. खेळताना तो अचानक पडला. त्यांनतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या मागे बायको आणि मुलगा आहे 2019 मध्ये दिल्ली येथे त्याचं लग्न झालं होतं.
'भाभीजी घरपर है' ही विनोदी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत. मलखानला या मालिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळाली होती. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेत त्याने वैभव माथूरच्या मित्राची भूमिका साकारली होती. वैभव आणि दीपेश यांची जोडी 'टीका-मलखान' म्हणून लोकप्रिय होती. अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दीपेश गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंज सृष्टीत कार्यरत होता. त्याने अनेक मालिकांमध्ये सहाय्यक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर दीपेशने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतसुद्धा काम केलं आहे. मात्र त्याला खरी ओळख 'भाभीजी घरपर है' या मालिकेने मिळवून दिली आहे. या अभिनेत्याच्या निधनावर अजूनही चाहत्यांना विश्वास ठेवणं कठीण होत आहे.