स्कूलबसला भीषण अपघात अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
केरळच्या कन्नड जिल्ह्यात स्कूल बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर अनेक विद्यार्थी जखमी झाले. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव बस पलटी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
या अपघातात स्कूल बस पलटी झाल्याने इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या ११ वर्षांच्या नेद्या एस राजेश या मुलीचा मृत्यू झाला. बसमध्ये बसलेले ही मुलगी अपघातानंतर बसच्या बाहेर फेकली गेली आणि बसखाली चिरडली गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
बुधवारी दुपारी चारच्या सुमारास श्रीकांतपुरमच्या वलक्कई भागात हा अपघात झाला. चिन्मय विद्यालयाची ही बस १८ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन शाळेतून घरी सोडण्यासाठी निघाली होती. बस महामार्गावरील उतारावरून उतरत असताना अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
बस चालक समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीला रस्ता देत होता त्यावेळी त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या बस अपघातामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर १८ विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृत विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मुलगी बसमधून खाली पडली आणि बसच्या चाकाखाली आल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताचे कारण ब्रेक फेल असल्याचे सांगितले जात असले तरी त्यामागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्व जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर शाळा प्रशासनाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी या घेटनेबाबत संताप व्यक्त केला.