अपघातानंतर बसला लागली अचानक आग    

वैजापूर / प्रतिनिधी - रोटेगाव उड्डानपुलावर दुचाकीला जोराची धडक दिल्यानंतर  अचानक पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार (दि. २५) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. ही बस कन्नड़ येथून वैजापूर कडे जात होती.या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
  बस चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि वाहकाने केलेली धडपडीपळीमुळे  बसमधील ३४ प्रवासी सुखरुप बचावले. बस पेटली पळा... पळा... ओरडत प्रवासी बसबाहेर सुखरुप पडले.  समोरासमोर धडक झाल्याने गरम इंजिनवर पेट्रोल उडाल्याने बसने पेट घेतल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले.


संजय पवार ( वय ४०,रा कन्नड़ ) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी कन्नड़हुन वैजापूरला जाणारी बस ( क्रमांक एमएच ४०, ऐन ९९४२) नेहमीप्रमाणे या मार्गावरून धावत असताना वैजापूरपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या रोटेगाव उड्डानपुलावर येताच वैजापूरकडून खंडाळकडे जाणारी दुचाकी बसला येऊन धडकली. यावेळी दुचाकीस्वार गाडीवरून जोरात फेकला गेला तर दुचाकी अदळल्याने बसच्या समोरील टायरने अचानक पेट  घेतला असल्याचे  चालकाच्या लक्षात आले. चालकाने लगेच बस महामार्गावर सुरक्षितरीत्या रस्त्याच्या कडेला घेतली. बस बंद करीअं त्यांनी बसमधील प्रवाशांना बस पेटल्याचे सांगत तातडीने खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. बसमधून खाली आलेल्या प्रवाशांनी सुरक्षितस्थळी जाईपर्यंत बसने मोठय़ा प्रमाणात पेट घेतला होता. रस्त्यावरील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी देखील मदतीसाठी धाव घेतली. जवळच असलेल्या वैजापूर पोलिसांना आणि अग्निशमन यंत्रणेला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेचच खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली.मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.बसचे चारही टायर  जळाले, तर बसच्या आतमधील भागसुद्धा जळून खाक झाला आहे. या अपघात दुचाकीस्वार संजय पवार गंभीर जखमी झाला असून, त्याला प्रथम शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. 


आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा