सोयगाव तालुक्यातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही - पालकमंत्री संदीपान भुमरे
औरंगाबाद / प्रतिनिधी - सोयगाव तालुका दुर्गम असल्याने तालुक्यात जनसुविधा व विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. यासाठी पालकमंत्री म्हणून सोयगावच्या विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन रोहयो तथा पालकमंत्री ना. संदीपान भुमरे यांनी सोयगाव येथे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात व्यक्त केले.
मागेल त्या शेतकऱ्यांना विहीर, शेततळे व गरज तेथे पानंद रस्त्यांना मंजुरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री भुमरे यांनी केले.
सोयगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार होते. हा कार्यक्रम पंचायत समितीच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी रोहयोचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार , जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी ( रोहयो) संदीप पाटील, रोहयोचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम, प्रभाकर काळे , माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, यांच्यासह तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक आदींची उपस्थिती होती.
सोयगाव तालुक्यातील शेतकरी दोन पिके घेणारा निर्माण व्हावा यासाठी सिंचन आराखडा तयार करण्यात आलेला असून त्या पद्धतीने सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी दिली.
सोयगावच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्यापासून सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी सोयगावच्या गावांना दत्तक घ्यावे असे . अब्दुल सत्तार म्हणाले.
शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार विविध योजना राबवित आहेत. त्या अनुषंगाने 10 हजार कोटींची पोखरा योजनेचा टप्पा 2 , कृषी विभागाकडून लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. वन विभागाला रोहयोची जोड देऊन तालुक्यातील डोंगरांगेत चर खोदण्यात यावा यामुळे वन्य प्राण्यापासून पिकांना संरक्षण मिळेल व पाण्याचे सिंचन होईल .यासाठी शासनास प्रस्ताव सादर केलेला असून हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी जवळपास 50 कोटी अनुदान मंजूर असून यापैकी 20 हजार शेतकऱ्यांना 33 कोटी रुपयांची मदत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्याटप्याने मदत वर्ग करण्यात येणार असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी 150 शेतकऱ्यांना विहीर तसेच 100 शेतकऱ्यांना रोहयो अंतर्गत गायगोठे, त्यासोबतच श्रावण बाळ योजने अंतर्गत 286, संजय गांधी योजनेच्या 126 , राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना 22 तर प्रधानमंत्री आवाज योजनेच्या 38 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.