दोन महिलांवर बिबट्याचा हल्ला
पुणे/प्रतिनिधी : मंगळवार (दि १०) सायंकाळी साडेसहा व आठ वाजता सलग दोन महिलांवर बिबट्याने रेटवडी, (ता. खेड) येथे दीड तासाच्या अंतराने वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला चढविला.
दुसऱ्या हल्ल्यात अरुणा संजय भालेकर,(वय ५०,रा. सतारका वस्ती) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोके, तोंडावर बिबट्याने पंजा मारून चावा घेतल्याने त्या गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना सुरुवातीला चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खोलवर जखमा होऊन रक्तस्राव झाल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
पहिले साडेसहा वाजता झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात रिजवना अब्दुल पठाण या महिला किरकोळ जखमी झाल्या. रेटवडीच्या पठाण वस्ती येथे हा हल्ला झाला. साडेसहा वाजता हल्ला झाल्यावर ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले. राजगुरूनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. रौन्धळ, दत्तात्रय फापाळे, शिवाजी राठोड, संदीप अरुण असे पथक या ठिकाणी पोहोचले. तेव्हा बिबट्या झुडुपात असल्याचे टॉर्चद्वारे पाहिल्यावर निदर्शनास आले. ग्रामस्थ आणि वनविभाग पथकाने गाजावाजा करून सुद्धा बिबट्या या ठिकाणी थांबून होता. समोर बिबट्या असतानाच आठ वाजता तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सतारका वस्तीवर अरुणा भालेकर या महिलेवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली.
सतारकावस्ती जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेला लग्न समारंभ उरकुन घरी जात असताना पानंद रस्त्यावर एकट्या महिलेवर हा हल्ला झाला. माहिती मिळाल्या बरोबर वऱ्हाडी मंडळी तसेच पहिल्या घटनेची माहिती घेणारे ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला उपचारासाठी हलविण्यात आले.
गेल्या दीड महिन्यात बिबट्याचा हल्ला होण्याची गावात ही चौथी घटना असुन यामुळे रेटवडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.