शिवसेना विभागप्रमुख दत्तात्रय वर्पे यांचा सिडको प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा
औरंगाबाद / प्रतिनिधी - सिडको वाळूज महानगर १ अंतर्गत एल. आय.जी. व एम. आय.जी. योजनेतील जुनाट आणि निरूपयोगी ड्रेनेजलाइन्स तात्काळ बदलण्यासाठी वारंवार अर्ज विनंत्या करूनही सिडको प्रशासनाने काहीही कृती न केल्याने व इतर मुलभुत समस्या सोडविण्यासाठी गुरूवार दिनांक ३० जुन २०२२ पासुन आपल्या वाळुज कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असा इशारा शिवसेना सिडको वाळूज महानगर एक चे विभागप्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी दिला आहे. शिवसेना विभागप्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी सिडको प्रशासक याना यासंदर्भात एक निवेदन दिले आहे. यावेळी अनेक दिवसांपासून समस्यांमुळे त्रस्त अनेक नागरिक देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते.
या निवेदनात त्यांनी वाळूज महानगर १ मधील एल. आय.जी. व एम. आय. जी. योजनेतील ड्रेनेज लाइन्स गेली अनेक वर्षे सातत्याने चोकअप होत आहेत. या योजनेतील घरे बांधत असताना टाकलेल्या ड्रेनेज लाइन्ससाठी फक्त ६ (सहा) इंच व्यासाचे पाइप वापरलेले आहेत. साधारण २५ वर्षापुर्वी असलेल्या लोकसंखेच्या तुलनेत वाळूज औद्योगिक परिसराचा झपाटयाने झालेला विकास आणि कामगारांच्या वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता सध्या असलेली ड्रेनेज व्यवस्था निश्चितच पुरेशी नाही. यामुळे येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे. तसेच दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. सिडकोने नागरिकांना जुनी घरे पाडुन नव्या इमारती बांधण्यासाठी नियमीत लेखी परवानग्याही दिल्या आणि सातत्याने आजही देत आहे. अर्थात बांधकाम परवाने देताना सिडकोने भरमसाट शुल्क आकारणी देखील केलेली आहे. येथील रहिवासी नियमीत कर भरणा देखील करत आहेत. असे असुनही नागरिकांना मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे.
या समस्यांमध्ये प्रामुख्याने ड्रेनेज लाइनचे ६ इंच व्यासाचे जुनाट पाइप बदलुन १८ इंच व्यासाचे नवीन पाइप टाकणे व सांडपाणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नवीन एस. टी. पी. उभारणे, खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करणे,वारंवार नादरूस्त होणारे जुने पथदिवे बदलून नवीन एल.ई.डी.दिवे बसवून देणे, ड्रेनेज लाइनचे ६ इंच व्यासाचे जुनाट पाइप बदलून १८ इंच व्यासाचे नवीन पाइप टाकणे व सांडपाणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नवीन एस.टी.पी. उभारणे. खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करणे, वारंवार नादुरूस्त होणारे जुने पथदिवे बदलून नवीन एल. इ. डी. दिव्यांसोबतच मुख्य उद्यानांमध्ये हायमास्ट पथदिवे लावणे, अंतर्गत आरोग्य केंद्र, पोलीस चौकी, समाज मंदिर, अंगणवाडी, शाळा, भाजी मंडई, बसस्टॉप या सर्व इमारतीचे नुतनीकरण व सुशोभीकरण करत बंद असलेल्या इमारती वापरात आणणे, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून महानगर १ परिसरात ग्रामीण रूग्णालयाची उभारणी करणे, घरांसमोर लोंबकळणाऱ्या तारांमुळे वसाहतीमध्ये वारंवार अपघात होऊन नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिण्या महावितरणच्या मदतीने भुमिगत करणे, दुर्लक्षित झालेल्या उद्यानांमध्ये वृक्ष लागवडीसह सुशोभीकरण करून लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून सर्व सुविधायुक्त करणे, चार दिवसांनी अपुऱ्या प्रमाणात होणारा पाणीपुरवठा दररोज व उच्च दाबाने करणे,अंतर्गत हरितपट्ट्यांमध्ये वृक्ष लागवड करून सुशोभीकरण करणे, कचरा संकलनाच्या बाबतीत सिडकोच्या ढिसाळ नियोजनामुळे पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. जोपर्यंत सिडको प्रशासकांकडून समाधानकारक लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण सुरू राहील. असा इशारा दत्तात्रय वर्पे यांनी दिला आहे.