नवी मुंबईच्या सीवूड्स येथील आश्रम शाळेतील 3 मुलींवर लैंगिक अत्याचार, 45 मुलांची सुटका
नवी मुंबई : नवी मुंबईच्या सीवूड्स सेक्टर-48 मधील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये बेकायदेशीररीत्या चालविण्यात येत असलेल्या आश्रमशाळेवर ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभागाने शुक्रवारी कारवाई केली आहे. त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या 3 ते 18 वयोगटातील 45 मुलांची सुटका केली. 45 पैकी 13 मुली होत्या. यातील 3 मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचे मुलींनी सांगितल्याने धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
याप्रकरणी बेलापूर येथील एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसानी एकाला ताब्यात घेतले आहे. यातील एका मुलीच्या गर्भपात केल्याची माहिती समोर येत असून , मुलींच्या पालकांना भेटू न देण्याचे प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी ठाणे जिल्हा महिला-बाल विकास विभागाने एन आर आय पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार मुलींचा जबाब नोंदविण्यात आला असून विनयभंग आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल करून चर्च मधील केअरटेकरला ताब्यात घेण्यात आलंय. सध्या त्याची चौकशी केली जातेय.