५० वर्षीय  महिलेवर अत्याचार व मारहाण

५० वर्षीय  महिलेवर अत्याचार व मारहाण

<span;>संभाजीनगर/ प्रतिनिधी : पतीने मारहाण केल्याने रागाच्या भरात घर सोडलेल्या ५० वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेवर सध्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून छावणी पोलिस ठाण्यात मंगळवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अंदाजे ५० वर्षीय महिला जखमी बेशुद्धावस्थेत पडेगावच्या रस्त्यावर पडलेली स्थानिकांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी धाव घेत तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या पाहणीत महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. शिवाय, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी नोंदवला. घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त महेंद्र देशमुख, निरीक्षक राजेंद्र होळकर, सहायक निरीक्षक सुषमा पवार, उपनिरीक्षक विकास खटके यांनी घाटीत धाव घेतली. पोलिस अंमलदार संजय रोकडे यांनी सरकारतर्फे याप्रकरणी तक्रार दाखल केली. सहायक निरीक्षक सुषमा पवार अधिक तपास करत आहेत.

आठ दिवसांपासून बाहेर संबंधित महिला मूळची चाळीसगावची रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तिला तिच्या पतीने मारहाण करून जखमी केले. मुलाने पैसे घेऊन वाईट वागणूक दिली. त्यानंतर ती पडेगावला माहेरी आली होती. मात्र, आठ दिवसांपासून ती तणावात बाहेरच फिरत होती. बरेच दिवस ती पडेगावातील एका दारूच्या दुकानासमोर देखील दिसून आली. त्याच दरम्यान रात्रीतून तिच्यावर अज्ञातांनी अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणात महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. शस्त्रक्रिया विभागात तिच्यावर उपचार सुरू आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. डॉक्टरांच्या अहवालावरून याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकृती स्थिर झाल्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होईल. याप्रकरणी सखाेल तपास सुरू असल्याचे सहायक आयुक्त महेंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा