मिलिंद महाविद्यालयातून दर्जेदार संशोधन व्हावे – डॉ. बी.पी. लहाने
औरंगाबाद /प्रतिनिधी - मिलिंद महाविद्यालयाला शैक्षणिक गुणवत्तेची मोठी परंपरा असून या महाविद्यालयातून संशोधन केंद्राच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील दर्जेदार संशोधन व्हावे असे प्रतिपादन माजी सहसंचालक डॉ. बी.पी. लहाने यांनी केले.
मिलिंद कला महाविद्यालयात आयोजित भूगोल विभागाच्या संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मदन सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. लहाने म्हणाले की, मिलिंद कला महाविद्यालयाचा परिसर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे. या महाविद्यालयातून आजपर्यंत लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्य करत आहेत, त्यापैकीच मी सुध्दा एक आहे. या परीसरात शिक्षणाची गंगा आणण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी अथक परीश्रम केले. हा शैक्षणिक वारसा येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी निरंतर पुढे सुरु ठेवावा असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान म्हणाल्या की, मिलिंद महाविद्यालयात आता इंग्रजी, मानसशास्त्र, भूगोल व राज्यशास्त्र विषयाचे संशोधन केंद्र सुरु झाल्याने येथे इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी पीएच.डी. ही शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी घेऊनच बाहेर जाईल. येथे संशोधन करणारे सर्वच विद्यार्थी नक्कीच दर्जेदार संशोधन करतील. यावेळी डॉ. मदन सुर्यवंशी यांनीही आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या संशोधन केंद्राला शुभेच्छा दिल्या व सर्व प्रकारचे सहकार्यकरण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. स्वाती केकरे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार डॉ. वनमाला तडवी यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल, डॉ. फेरोज पठाण, डॉ. भन्ते एम. सत्यपाल यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.