खाम नदी पूनरोज्जीवन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर
औरंगाबाद/ प्रतिनिधी - खाम नदी पूनरोज्जीवन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, महापालिकेचे अधिकारी आणि सौर ऊर्जेचे तज्ञ प्रा. चेतन सिंघ सोलंकी यांनी खाम नदी काठावर श्रमदान दिले.
प्रा सोलंकी यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले आणि पाण्डेय यांचे अभिनंदन केले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशासक महोदय म्हणाले की, खाम नदी पूनरोज्जिवन प्रकल्प मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात हाती घेण्यात आला होता. मागच्या वर्षी शहरात अतिवृष्टी देखील झाली होती. पण तो पर्यंत खाम नदीची खोली आणि रुंदी मोहिमेंतर्गत वाढली होती या कारणाने नदीलगत तसेच सखल भागात अतिवृष्टीचा परिणाम झाला नाही. अतिरिक्त पावसाचे पाणी खाम नदीच्या माध्यमातून शहराबाहेर वाहून गेले.
पर्यावरण विषयी बोलताना ते म्हणाले की, आपण आपल्या अपत्यासाठी पुढच्या 20 वर्षांचे शिक्षण आणि आर्थिक नियोजन करतो, पण आपण कधी हा विचार केला का 20 वर्षानंतर आपल्या पुढच्या पिढीला जीवन जगण्यासाठी सर्वात जास्त ज्या गोष्टींची गरज भासणार आहे ती म्हणजे शुद्ध वायू आणि पाणी आहे. आपण आज पर्यावरण पूरक जीवन शैली अवगत केली तर याचे फळ 20 वर्षानंतर का होईना आपल्या पुढच्या पिढीस शुद्ध वायू आणि जल या स्वरूपात मिळणार आहे. पर्यावरणात बदल म्हणजे तापमान वाढेल आणि अधिक तपमानात पुढच्या पिढीला जीवन जगण्यास कष्ट सहन करावे लागतील. यासाठी आपल्या आजच्या जीवन शैलीत बदल घडणे हाच एक मात्र उपाय आहे.
प्रशासक महोदय पुढे म्हणाले की, प्रत्येक शहर नदी काठावर आहे. आपले शहर पण खामनदीच्या काठावर आहे. नदी आणि त्याचे पर्यावरण शहराला स्वच्छ वायू देण्यास सर्वात जास्त मदत करतात. आपले कर्तव्य आहे की आपण शहराचे प्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी आणि शहर जिवंत ठेवण्यासाठी शहराच्या मधोमध वाहणार्या खाम नदीचे पूनरोज्जीवन करावे. नदी जिवंत ठेवली तर शहर जिवंत राहील.अपारंपारिक उर्जे बाबत बोलताना पाण्डेय म्हणाले की, औरंगाबाद महानगरपालिका तर्फे शहरातील 60,000 एल ई डी पथदिवे लावण्यात आलेले असून यासाठी विजेचा वापर 15 लाख युनिट पासून 09 लाख युनिट पर्यंत घसरला आहे. महापालिकेच्या टप्पा क्रमांक 03 इमारतीवर सोलर पॅनल बसविले असून त्या इमारतीचा वीज वापर कमी झाला आहे.तसेच भविष्यात महानगरापालिकेतर्फे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात येणार आहे, याच्यात विशेषतः इलेक्ट्रिक बसेसचा समावेश असणार आहे.
यावेळी प्रा सोलंकी मार्गदर्शन करताना म्हणाले की, पर्यावरणीय बदल आणि प्रदूषणामुळे मानवजातीच्या जीवनास धोका निर्माण झाला आहे. आता वेळ आली आहे की आपण सौर ऊर्जा म्हणजेच स्वच्छ उर्जेकडे वळु या.
ते पुढे म्हणाले की,आपणास पारंपरिक ऊर्जेचा 85 टक्के भाग वीज, ऑईल आणि गॅस या माध्यमातून मिळतो. भारतासाठी 74 टक्के ऊर्जेची निर्मिती कोळसा पासून करण्यात येते याच कारण आहे की भारताचा आणि जगाच्या पर्यावरणात बदल होत आहे. जागतिक तापमान वाढत आहे. ते म्हणाले की हवेत कार्बन डायऑक्साईड चे आयुष्य किमान 300 वर्ष इतके आहे, प्रदूषण करताना आपण याची जाणीव ठेवावी. ते म्हणाले की पारंपरिक ऊर्जेचा वापर कमी करण्याचा एकच पर्याय आहे की आपण त्याची आवश्यकता कमीत कमी ठेवावी. शासकीय कार्यालय, शाळा, अंगणवाडी सौर ऊर्जेवर चालवावे. त्यांनी प्रशासक महोदय यांच्या संकलपनेतून साकारलेले खाम नदी प्रकल्प, सौर ऊर्जा प्रक्लप आणि ई वेहीकल प्रकल्पांचे कौतुक केले आणि त्यांना या दिशेने पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.
प्रा सोलंकी हे आय.आय. टी मुंबई येथे सौर उर्जाचे प्राध्यापक असून त्यांनी सौर ऊर्जेचा महोत्सवाबाबत प्रबोधन करण्याच्या हेतूने पुढच्या 11 वर्षे (2030) पर्यंत घरी ना जाता एका सौर बसमध्ये राहण्याचे संकल्प केला आहे. या संकल्प अंतर्गत त्यांनी नोव्हेंबर 2020 पासून एनर्जी स्वराज यात्रा सुरू केली आहे.सदरील यात्रेत सौर ऊर्जेचा संदेश देण्यासाठी त्यांनी देशातले पांच प्रदेशांचे प्रवास केला आहे. ज्या बस मध्ये प्रा सोलंकी राहतात त्याच्या छतावर 3.2 KW सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. बसमध्ये लाईट, कुलर,टिव्ही,एसी आणि लॅपटॉप चार्जिंग इत्यादी सौर ऊर्जेवर चालतात.
यावेळी छावणी परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, उप संचालक नगररचना ए बी देशमुख, कार्यकारी अभियंता यांत्रिकी डी के पंडित, उप अभियंता (विद्युत) मोहिनी गायकवाड, उद्यान अधीक्षक विजय पाटील, कनिष्ठ अभियंता सय्यद बाबर, इकोसत्वाचे गौरी मिराशी, स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान व इतर कर्मचारी, स्वयंसेवक यांची उपस्थिती होती.विशेष म्हणजे यावेळी मा प्रशासक महोदय यांचे चिरंजीव कुमार देवमान हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी यांनी केले तर विक्रांत मोरे यांनी आभार व्यक्त केले.