औरंगाबादेतुन निघणार शेकडो गाड्यांचा ताफा

औरंगाबादेतुन निघणार शेकडो गाड्यांचा ताफा

औरंगाबाद/प्रतिनिधी - एमआयएम पक्षाच्यावतीने मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे आणि महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या  नेतृत्वात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातुन मुंबई पर्यंत शांततेने व शिस्तबध्द पध्दतीने दिनांक 11 डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.०० वाजता तिरंगा रॅली निघणार असुन मुंबईत रॅलीचे सायंकाळी ५.०० वाजता आमसभेत रुपांतर होवुन सभेस बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी संबोधित करणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी आज सुभेदारी विश्राम गृहात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
          खासदार इम्तियाज जलील हे स्वत: आमखास मैदान औरंगाबाद येथून अंदाजित ३०० हुन जास्त  चारचाकी गाड्यांच्या ताफ्यासह अहमदनगर – पुणे – पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे – लोणावळा - पनवेल यामार्गाने मुंबईला रवाना होणार असुन ताफ्यातील सर्व गाड्यांवर तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे याव्यतिरिक्त एमआयएम पक्षाचा कोणताही झेंडा गाड्यांवर लावला जाणार नाही. याचप्रकारे बीड, जालना, नांदेड, परभणी, वर्धा, पुणे, नाशिक यांच्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातुन तिरंगा रॅली मुंबईत जाण्यासाठी निघणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

स्व. काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पित करणार
          औरंगाबादेतुन तिरंगा रॅली निघाल्यानंतर कायगाव टोका येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्व.काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहीली जाणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

तिरंगा रॅली व सभा रद्द करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्री व नेत्यांचा पोलीस प्रशासनावर दबावतंत्र
          खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत तिरंगा रॅलीची माहिती देतांना मुंबईत नेमके कोणत्या ठिकाणी बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांची सभा होणार असल्याची माहिती देण्याचे टाळले. मुंबईत सभेसाठी आतापर्यंत जे ग्राउंड व हॉल बुक करण्यात आले होते त्यास काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्री व नेत्यांनी स्थानिक प्रशासन व पोलीस विभागावर दबावतंत्र वापरुन रॅली व सभेची परवानगी नाकारण्यास भाग पाडल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी लावला. तिरंगा रॅली शांततेने निघणार असुन पोलीस विभागाने वाहतुकीसाठी योग्य ते उपाययोजना करुन सहकार्य करण्याची विनंती खासदार इम्तियाज जलील यांनी केली असुन त्याबाबत पोलीस महानिरिक्षक यांच्यासह मार्गातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षकांना पत्र पाठविल्याची माहिती दिली.

ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सुध्दा रॅलीत सहभागी व्हावे
          ज्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले होते त्याचप्रमाणे इतर विविध राजकीय पक्षातील मुस्लिम नेत्यांनी सुध्दा तिरंगा रॅलीत सहभागी होवुन अल्पख्यांक मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन संघर्ष करावे तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण सुध्दा रद्द झाल्याने त्या समाजाच्या नेत्यांनी सुध्दा रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी होवुन आपला हक्क मागावे तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर राजकीय पक्षातील नेत्यांना पत्र पाठवुन रॅलीत सहभागी होण्याचे आहावन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

वक्फ मालमत्ता प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यानी तात्काळ बैठक घ्यावी  
          महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खासदार शरद पवार यांच्यासोबत वक्फ सदस्यांची वक्फ मंडळाच्या विविध मुद्दयांवर महत्वपुर्ण बैठक मुंबईत पार पडली होती. सदरील बैठकीत शरद पवार यांनी वक्फ मंडळाला विशेष पॅकेज व केंद्र व राज्य शासनाच्यावतीने होणारे विविध विकासात्मक प्रस्ताव व कामात संपादित झालेल्या वक्फ मालमत्तेचा जिल्हा प्रशासनस्तरावर अडकलेला कोट्यावधींचा मोबदला वक्फ मंडळास मिळण्यासाठी वक्फ सदस्यांच्या मागणीवरुन मुख्यमंत्री यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तीन महिण्यांचा अवधी झाल्यानंतर सुध्दा बैठक घेण्यात आली नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा