कापसाच्या रुई आधारित बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग होणे महत्त्वाचे - कृषिमंत्री अब्दुल सत्तार तालुक्यातील पांढरे सोने जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत
सिल्लोड / प्रतिनिधी - जागतिक बँक अर्थ साहाय्यित वंदनीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (Smart) स्मार्ट कॉटन उपप्रकल्प योजनेअंतर्गत एक गाव एक वाण या धर्तीवर एक जिनसी कापूस उत्पादन करून स्वच्छ कापूस निर्मिती करण्याकरिता सिल्लोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत उपक्रम राबविण्यात येत आहे या प्रकल्पाचा शुभारंभ कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की रुई आधारित कापूस बाजारपेठेत शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून स्मार्ट कॉटन ही योजना दिशादर्शक ठरेल.
या प्रकल्पांतर्गत सिल्लोड तालुक्यातून दहा गावांचा समावेश आहे. त्यातील पेंडगाव येथील पेंडगाव आकाश ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनी तील 30 शेतकऱ्यांचा 500 क्विंटल कापूस पुनीत एंटरप्राइजेस यांच्या सहकार्याने जिनिंग व प्रेसिंग करण्याकरता संकलन करण्यात आला. त्यावर प्रक्रिया करण्याकरता राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शुभहस्ते आज ( दि.2 ) शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांचा कापूस मूल्य साखळीमध्ये सहभाग होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेल्या बाजार मूल्याचा फायदा नक्की होईल. स्मार्ट कॉटन या योजनेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची जुळण्याची मोठी संधी उपलब्ध होत असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे , प्रभू सपकाळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक समाधान चौधरी , महालिंग कुंभार ,संजय सुस्ते, अंबादास सोमासे ,मानाजी पवार, रामदास डफळ, काकासाहेब पवार, पुंडलिक सुस्ते ,हरिदास पारखे ,संतोष पारखे ,फिनिक्स जिनिंगचे विशाल जाधव, कापूस पणन महासंघाचे धर्मेंद्र सोमवंशी, नागेश सोमवंशी तसेच पुनीत एंटरप्राइजेस चे व्यवस्थापक यादव, राजू सरोदे, विजय कोहली आदी उपस्थित होते.
--------------------------------------
महाराष्ट्राचा स्मार्ट कॉटन हा ब्रँड डेव्हलप होणार असून महाराष्ट्रातील माझ्या शेतकऱ्यांची ओळख असणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची जुळून होणारा फायदा निश्चित माझ्या शेतकरी बांधवांना होईल - अब्दुल सत्तार ( कृषी मंत्री )
--------------------------------------
कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही सर्व कापूस उत्पादक शेतकरी एकत्र येऊन कापूस गाठी तयार करीत आहोत. गाठीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चित फायदा व्हावा ही माफक अपेक्षा.-
संजय सूस्ते गट प्रवर्तक पेंडगाव
----------------------------------------
शेतकऱ्यांना शेतीशाळा तसेच गाव बैठका यांच्या माध्यमातून गट निर्मिती, एक गाव एक वाण, कापूस स्वच्छ वेचणी मोहीम यांच्या माध्यमातून प्रवृत्त करण्यात यश आले. आणि सिल्लोड तालुक्याने गाठी निर्मितीचा मान पटकावला -
ज्ञानेश्वर बरदे
तालुका कृषी अधिकारी सिल्लोड