कायदा-सुव्यवस्था राखणं गृहमंत्र्यांचं काम, पण राज्याचा गृहमंत्रीच नाही; बकात्काराच्या घटनांवरून चाकणकरांचा टोला
पुणे : राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे गृहमंत्र्यांचे काम असते. पण राज्याला गृहमंत्री नाहीत, असे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. भान येथे एका महिलेवर तीन इसमांनी बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने (State Women’s Commission) दखल घेतली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक झाली असून उर्वरित एका आरोपीला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिलेत, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. पोलीस पोलिसांचे काम करत आहेत. अशा घटना घडूच नयेत, यासाठी महिला आयोग प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची दखल घेऊन कोणाकडे तरी ही जबाबदारी सोपवावी आणि महिलांना सुरक्षितता (Women’s security) द्यावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.
ही आहे घटना?
भंडारा जिल्ह्यात घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तर एक जण फरार आहे. या अत्याचारामुळे पीडित महिलेला तीव्र जखमा आणि प्रचंड रक्तस्राव होत होता. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या महिलेवर अत्याचार केला होता. तर अत्याचारानंतर तिला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. सध्या तिच्यावर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
सामाजिक आणि राजकीय अशा विविध स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. महिला अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीत. नराधमांना कठोर शिक्षा करा, अशी मागणी संतप्त नागरिक करीत आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही नुकतीच पीडित महिलेची नागपूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी बोलून विचारपूस केली. दरम्यान, पुण्यात एका सात वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटनाही घडली. एवढे करून समाधान झाले नाही, तर त्या मुलीची हत्यादेखील करण्यात आली.