भरदिवसा घरात घुसून दोघांची महिलेला जबर मारहाण
सोसायटीतील महिलांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण
औरंगाबाद / प्रतिनिधी : रूम किरायाणे घेण्याच्या बहाण्याने भरदिवसा घरात घुसलेल्या दोघांनी एका महिलेला स्क्रू ड्रायव्हर आणि गॅस शेगडीच्या जाळीने डोक्यात तसेच तोंडावर मारहाण करत कान फोडल्याची घटना गुरूवारी (दि.१०) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास बजाजनगर भागातील वडगाव को. परिसरात घडली. सोसायटीतील महिलांच्या सतर्कतेमुळे मारहाण झालेल्या महिलेचे प्राण वाचले. दरम्यान घरात घुसलेल्या दोघा भामट्यांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
बजाजनगरात भागातील वडगाव को. परिसरात द्वारकानगरी सोसायटीत गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन भामटे रूम पाहाण्याच्या बहाण्याने एका घरात घुसले. घरात प्रवेश करताच त्या दोघा भामट्यांनी दरवाजा बंद करून आतून कडी लावली. त्यानंतर या दोघा भामट्यांपैकी एकाने स्वयंपाक घरात काम करत असलेल्या तीस वर्षीय महिलेवर हल्ला केला. त्यामुळे चिडलेल्या महिलेने त्याचा प्रतिकार करत त्याच्या डोक्यात गॅसची लोखंडी जाळी मारली. महिला आणि भामट्यात सुरू असलेला आवाज ऐकून बैठक खोलीत असलेला दुसरा भामटा हा सुध्दा स्वयंपाक घरात गेला. त्यावेळी जखमी महिलेने त्याच्याही डोक्यात गॅस शेगडीची जाळी मारली. त्यानंतर त्या दोघा भामट्यांनी महिलेच्या हातातील जाळी हिसकावून घेतली. त्यानंतर त्याच जाळीने त्या दोघा भामट्यांनी महिलेच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केली. दरम्यान महिलेची आरडाओरड ऐकून सोसायटीतील महिला आणि तरूण घराजवळ जमा झाले. सोसायटीतील काही महिलांनी घराच्या पाठीमागील बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या भामट्यांनी स्वयंपाक घराचा दरवाजाही आतून बंद करून घेतला. दरम्यान सोसायटीतील महिलांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भामट्यांच्या तावडीतून त्या महिलेची सुटका केली. भाभट्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. घरात घुसून महिलेला जबर मारहाण करणार्या त्या दोघा भामट्यांना पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
पोलिसांनी गस्त वाढवण्याची महिलांची मागणी
दिवसाढवळ्या चोरी, घर फोडीच्या घटनासह मुली, महिलांच्या छेडछाडीच्या तसेच आत्याचार झाल्याचे वर्तमान पत्रातून वाचण्यात येते. मात्र आजतर दिवसाढवळ्या घरात घुसून एका महिलेला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. घरातील पुरुष नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर असतात. अधिकतर सोसायट्यांमध्ये महिला आणि लहान मुलेच घरी असतात. त्यामुळे पोलिसांनी अशा सोसायटीतील गस्तीचे प्रमाण वाढवायला हवे, अशी मागणी द्वारकानगरी या सोसायटीतील महिलांनी केली आहे.