स्टेशन भवनचं लिंटेल बीम अचानक कोसळलं
उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या भागातील स्टेशन भवनचं लिंटेल बीम अचानक कोसळलं. या दुर्घटनेत अनेक प्रवासी आणि कर्मचारी दबले गेले आहेत. शनिवारी ही भीषण दुर्घटना घडलीय.
नेमका आकडा समोर आलेला नाही पण ४० ते ५० जण या ठिकाणी होते अशी माहिती समजते. घटनेनंतर स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. बाहेर काढलेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
कन्नौज रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या बांधकामाचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली. यात ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. आतापर्यंत २२ जणांना बाहेर काढण्यात आलंय. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर आणखी १५ जण अडकले असण्याची शक्यता आहे.
घटनास्थळी असलेल्या एकाने सांगितलं की, लिंटेल टाकण्यासाठी सिमेंटचा माल तयार करायला सुरु होतं. त्यावेळी काम करत असताना अचानक लिंटेल खाली कोसळलं. त्या ढिगाखाली अनेकजण अडकले आहेत. जवळपास ४० ते ५० जण याठिकाणी होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना घटनेत जखमी झालेल्यांवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देशही दिलेत.