बस चालकाला चक्कर आली अन्

बस चालकाला चक्कर आली अन्

परभणी / प्रतिनिधी - परभणी जिल्ह्यातील एसटी बस चालकाला  भोवळ आल्यामुळे त्याचं गाडीवरुन नियंत्रण सुटलं आणि अपघात घडला.या अपघातानं अनेक दुचाकींचं प्रचंड नुकसान झालं आहे. तसंच एसटी बसच्या दर्शनी भागालाही मार बसलाय.
या अपघातात रस्त्याशेजारी पार्क केलेल्या गाड्यांनाही जोरदार धडक बसली. यात अनेक दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातावेळी पार्क केलेल्या दुचाकींवर कुणीही बसलेलं नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान, दुचाक्यांना धडक दिल्यानं बस थेट झाडाला जाऊन भिडली आणि थांबली.

या अपघातात बस चालकाच्या डोक्याला मार लागलाय. तसंच काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. अपघातानंतर तातडीनं जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

10 दुचाकी आणि 2 कारचं नुकसान

एसटी बसचा हा अपघात परभणीच्या जिंतूर शहारात घडला. या शहरातील मुख्य चौकातच एसटी दुचाकी आणि कारला धडक दिली. या अपघातात दोन कार आणि तब्बल दहा दुचाक्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. यापैकी एक दुचाकी तर एसटी बसच्या जवळपास टायरखालीच आली होती.

थोडक्यात अनर्थ टळला!

या भीषण अपघातात थोडक्यात अनर्थ टळलाय. ही एसटी बस कळमनुरी येथून जिंतूरला येत होती. त्यावेळी हा अपघात घडला. एमएच 13 सीयू 7543 असं अपघात झालेल्या एसटी बसचा नंबर आहे. ही बस कळमनुरी एसटी आगारतीलच आहेत.

चालकानं काय सांगितलं?

दरम्यान, अपघात झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चालकाचीही काहींनी विचारपूस गेली. त्यावेळी चालकानं चक्कर आली नव्हती असं म्हटलंय. मात्र गरगरल्यासारखं वाटल्यानंतर काहीच कळलं नाही आणि अपघात झाला, असंही एसटी बसच्या चालकानं म्हटलंय. एसटी बस चालक्याच्या डोक्याला या अपघातात मार लागलाय. दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्यांनी नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा