कचऱ्यापासून गॅस व वीज निर्मिती प्रकल्प आता मनपाकडे

कचऱ्यापासून गॅस व वीज निर्मिती प्रकल्प आता मनपाकडे

औरंगाबाद/ प्रतिनिधी - कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून गॅस, वीज निर्मिती प्रकल्प चालविण्यासाठी इंदूरच्या बँको कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.

मागील तीन वर्षांत कंपनीने गॅस, वीजनिर्मिती केलीच नाही. उलट मनपाला कोट्यवधी रुपयांचे बिल सादर केले. मनपाने कंपनीला करार रद्द करण्याची नोटीस दिली असून, प्रकल्प ताब्यात घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प भविष्यात मनपा प्रशासनच चालवेल, असे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

कोट्यवधी रुपये खर्च करून ३० मे. टन क्षमतेचा प्रकल्प २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून आजपर्यंत ना बायोगॅस मिळतो, ना वीज मिळते. तरीदेखील या प्रक्रिया केंद्रासाठी शहरातील सुमारे २० मे. टन एवढा ओला कचरा पुरविला जातो. बँको सर्व्हिसेसकडून हा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने पाहिजे त्या पद्धतीने कार्यवाही केली जात नाही. कांचनवाडी प्रक्रिया केंद्राचे सुमारे १० लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. हे वीज बिल बँको कंपनीने भरले नसल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी कांचनवाडी प्रक्रिया केंद्राचा वीजपुरवठा तोडण्यात आला. मनपाच्या घनकचरा विभागाने बँको सर्व्हिसेस एजन्सीला आतापर्यंत तीनदा नोटिसा बजावल्या. तरीदेखील बँकोने प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच मनपा प्रशासकांनी बोलावलेल्या बैठकीस बँकोचे प्रतिनिधी हजर राहिले नाहीत.

त्यामुळे घनकचरा विभागाने ५ डिसेंबर रोजी बँको सर्व्हिसेस एजन्सीला आपल्यासोबत मनपाने केलेला करार का रद्द करू नये, अशी नोटीस बजावली असून एका महिन्याच्या आत प्रशासक तथा <span;>आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर येऊन खुलासा सादर करावा, असे म्हटले होते. त्यानुसार २० डिसेंबर रोजी आयुक्त डॉ. चौधरी यांच्यासमवेत कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीतही कंपनीच्या प्रतिनिधींनी कांचनवाडी प्रकल्पासंदर्भात कोणतीही भूमिका मांडली नाही. या संदर्भात डॉ. चौधरी म्हणाले की, कांचनवाडीचा बायोगॅस, वीज निर्मिती प्रकल्प महापालिकेने चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा