ऑरिक सिटीमध्ये अधिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न  -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ऑरिक सिटीमध्ये अधिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न  -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद/प्रतिनिधी-  राज्याचे मुख्यमंत्री   उद्धव ठाकरे यांनी आज  शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील  ऑरिक सिटी प्रकल्पाची पाहणी केली.  ऑरिक सिटी प्रकल्पात मोठया प्रमाणावर गुंतवणूक होण्यासाठी  राज्य शासन निश्चितपणे प्रयत्न करेन, असे येथे त्यांनी सांगितले.

        उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार अनिल देसाई, आमदार संजय शिरसाट, आमदार उदयसिंह राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय, ऑरीक सिटीचे सहव्यवस्थापकीय संचालक जितेंद्र काकुस्ते,  ऑरीकचे सहाय्यक सहव्यवस्थापक शैलेश धाबेकर, वरिष्ठ व्यवस्थापक अनिल पटने, महेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.



   शेंद्रा येथील ऑरिक सिटीच्या सभागृहात  दिल्ली-मुंबई कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या या औद्योगिक सिटीचा मुख्यमंत्र्यांनी   सविस्तर आढावा घेतला.   प्रकल्पाच्या कामकाजाबाबत   समाधान व्यक्त करुन जास्तीत जास्त उद्योग येण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली. कोविडसारख्या  प्रतिकूल परिस्थितीतही  औद्योगिक विकासाला चालना देण्यात आली असून ऑरिक सिटीमध्ये उद्योगासाठी  नियोजनबध्द पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे  उद्योजक या ठिकाणी गुंतणुकीसाठी  उत्सुक आहेत. राज्य शासनाकडूनही येथे औद्योगिक गुंतवणुक होण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  डॉ. अनबलगन  यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.

            बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ऑरिक सिटीच्या संपूर्ण इमारतीची पाहणी केली. प्रकल्पाचा आराखडा आणि नियंत्रण कक्षाला भेट देवून त्यांनी माहिती घेतली.  ऑरिक हे दहा हजार एकरवर वसलेले सर्व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेले औद्योगिक शहर आहे. केंद्र व राज्य सरकारचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या ऑरिक सिटी क्षेत्रात विविध उद्योगांसाठी सुनियोजित पायाभूत सुविधा आहेत.  


आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा