बँक सखीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी बँकांनी तत्परतेने कार्यवाही करावी - जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय
औरंगाबाद / प्रतिनिधी - ग्रामीण भागात बँक सखीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी बँकांनी तत्परतेने कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँक समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी पाण्डेय बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रबंधक महेश डांगे, रिझर्व बँकेचे प्रादेशिक अधिकारी श्री कल्याणकर, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर, जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, जिल्हा अग्रणी बँकेचे अध्यक्ष मंगेश केदार, जिल्हा उद्योग केंद्रच्या करूणा खरात, स्टेट बँकेचे सुनील धामणकर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक गणेश कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व सर्व बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पाण्डेय म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी बँक सखीच्या माध्यमातून नागरिकांना ग्रामीण भागात योजनेबाबत मार्गदर्शन आणि बँकेसंदर्भातील मदत उपलब्ध करून द्यावी, असेही जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले.
कृषीवर आधारित योजनाबाबत लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला बँकांनी तात्काळ मंजुरी द्यावी. शेतकरी, महिला अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय घटकाच्या विभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेऊन त्रुटीची पूर्तता करावी व नागरिकांना गतीने लाभ मिळवून द्यावा. आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यात शासनाच्या योजनेच्या लाभाची रक्कम जमा होत आहे, आधार एनेबल असणाऱ्या बँकेच्या खात्यातही शासनाच्या योजनाची रक्कम जमा होते ही रक्कम ज्या बँकांमध्ये प्रस्ताव सादर केलेले आहेत त्याच बँकांनी लाभार्थ्यांना मिळण्याबाबत कारवाई करावी. सर्व बँकेच्या शाखेमध्ये खात्याचे एनपीए होणाऱ्या खात्याचा पाठपुरावा घेऊन सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करावी. खातेदाराच्या सिबिलचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले.
प्रधानमंत्री किसान योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना याचा तालुका व योजनानिहाय आढावा घेण्यात आला. 31 मार्च पर्यंत सर्व बँकांनी विविध योजनेच्या उर्वरित लक्ष्यांक पूर्ण करून अहवाल सादर करावा असे निर्देशही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले.
उमेद अभियाना अंतर्गत ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या समूह बचतगटाच्या माध्यमातून बँक सखी आणि भिशी सखी यांच्या माध्यमातून बँकांनी आपली बँकिंग सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवावी. बँक, शासन आणि नागरिक यांच्या समन्वयाने नागरिकांना कर्जासारख्या विविध सुविधा बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात मदत होईल. सर्व बँकांनी बँक सखीची नियुक्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले.
शासनाच्या विविध महामंडळाचे यात महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, इतर मागास व बहुजन कल्याण विकास महामंडळ अशा विविध महामंडळाच्या लक्ष्याकांची माहिती या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे अध्यक्ष मंगेश केदार यांनी दिली.
उमेदच्या बँक सखीशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधून बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शिक्षण, महिला सक्षमीकरण व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास महत्त्वाचा सहभाग असल्याचे सांगत सुरू असलेल्या कामाबाबत कौतुक केले.
जिल्ह्यात विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संबंधित बँकांचे प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले.
प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योगात जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी महाराष्ट्र ग्रामीण व्यवस्थापक मनाहेर वाडकर, एसबीआयचे शाखा व्यवस्थापक सतीशकुमार सिन्हा,एसबीआयचे शाखा व्यवस्थापक स्वामी भास्कर भोयर यांचे अभिनंदन करण्यात आले. बँक सखी म्हणून काम करणाऱ्या विविध महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. विविध तालुक्यातील महिलांनी सहभाग नोंदविला. गंगासागर पडूळ लाडसांगवी ,गंगा बांबर्डे तालुका फुलंब्री, मंदाकिनी चव्हाण यांनी आपले अनुभव बैठकीत सांगितले.