औरंगाबादकरांसाठी खुशखबर सोमवारपासून पाणीपट्टीचे नवे दर लागू
औरंगाबाद / प्रतिनिधी - औरंगाबाद शहरातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी 4 हजार 50 रुपयांवरून 2 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिकेने ठराव मंजूर केला आहे. सोमवारपासून या निर्णयाची अमंलबजावणी होणार असल्याचे महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
शहरातील पाणी सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिकेतर्फे विविध निर्णय घेत कामे केली जात आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा पाच दिवसआड केला जात आहे. त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी उपाय-योजना सुरू आहेत. मात्र पाणी पुरवठ्यावरून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असल्याने तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 13 जूनला आढावा बैठक घेऊन पाणीपट्टी निम्मी करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. प्रशासनाने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेश पण त्यांनी दिले होते.
त्यानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी कर सुसुत्रिकरणासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. या समितीने अभ्यास करुन पंधरा दिवसांपूर्वी आपला अहवाल प्रशासकांना सादर केला होता. दरम्यान पांडेय यांची सिडको प्रशासकपदी बदली करण्यात आली असून, त्यापूर्वी त्यांनी पाणीपट्टी कपातीचा ठराव मंजूर केला असल्याचे अपर्णा थेटे यांनी सांगितले.
एकाच डिमांड नोटमध्ये समावेश
महापालिकेने यावर्षीपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी एकाच मागणीपत्राच्या (डिमांड नोट) माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यात जुने म्हणजेच 4 हजार 50 रुपये अशी पाणीपट्टीची नोंद होती. या सॉफ्टवेअरमध्ये आता 2 हजार रुपये असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारपासून नागरिकांना दोन हजार रुपये पाणीपट्टी भरता येईल, असे अपर्णा थेटे यांनी सांगितले.