प्रा.सुरेश पुरी यांना जीवन गौरव पुरस्कार

प्रा.सुरेश पुरी यांना जीवन गौरव पुरस्कार

औरंगाबाद दि. 25 :  केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा व राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते औरंगाबाद येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा हिंदी प्रचार सभेचे परीक्षा मंत्री सुरेश पुरी यांना जीवन गौरव पुरस्काराने रविवारी (ता. 26) सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे,  सचिव दयानंद बिरादार यांनी दिली. या कार्यक्रमास लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उदगीर नगर परिषदेचे अध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, असेही ते म्हणाले. 

उदगीर तालुका पत्रकार संघाकडून अनेक वर्षापासून मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतात. पत्रकारितेतील शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कार देण्याची घोषणा पत्रकार संघाकडून यावर्षी पहिल्यांदाच करण्यात आली आहे, त्यात प्रा. पुरी यांची निवड करण्यात आलेली आहे. या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम उदगीर येथील नांदेड रोडवरील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात सकाळी 10 वाजता होणार आहे. 

पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातून मराठवाडास्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागून तज्ज्ञ परीक्षक मंडळामार्फत स्पर्धकांची निवड करण्यात येते. पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त पत्रकारांना अनुक्रमे पाच,तीन व दोन हजार रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळात कार्यकरणाऱ्या आरोग्य, महसूल, नगरपरिषद व पोलिस विभाग प्रमुख यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 



आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा